Operation Sindoor: भारतीय लष्कराकडून 15 दिवसात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) बदला घेण्यात आला. अवघ्या 23 मिनिटांत भारतीय सैन्यदलांकडून ऑपेरशन सिंदूर (Operation Sindoor) फत्ते करण्यात आले. पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. मुरिदकेच्या मरकझ तय्यबा मशिदीवरील हल्ल्यात अब्दुल मलिक आणि मुदस्सीर ठार झाल्याची माहिती मिळत आहे. फ्रान्सकडून घेतलेल्या राफेल विमानांनी ऑपरेशन सिंदूरद्वारे जबरदस्त कामगिरी केली. स्काल्प क्षेपणास्त्रांचा अचूक मारा करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले.

भारताने पाकिस्तानवर एअर स्टाईक केल्यानंतर चीनने हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली होती. भारताची आज सकाळी झालेली लष्करी कारवाई दुर्दैवी आहे. सद्यस्थितीबाबत आम्ही चिंतेत आहोत. भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी देश आहेत आणि चीनचेही शेजारी आहेत. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो. दोन्ही देशांनी शांतता आणि स्थैर्याच्या दृष्टीने विचार करावा, संयम बाळगावा, शांतता राखावी आणि परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल असे कोणतेही पाऊल उचलू नये, असे आम्ही दोघांनाही आवाहन करतो, असं चीनने म्हटलं. चीनच्या या भूमिकेवर आता भारताने देखील ठणकावून सांगितलं आहे. 

ऑपरेशन सिंदूर दुर्दैवी म्हणणाऱ्या चीनला भारताने ठणकावले-

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात चर्चा झाली. यावेळी पाकिस्तानकडून अतिरेक झाला तर उत्तर देण्याची आमची तयारी आहे, असं अजित डोवाल यांनी सांगितलं. परिस्थिती चिघळावी अशी भारताची इच्छा नाही, पण जर पाकिस्तानने तणाव वाढवला तर आमची निर्णायक उत्तर देण्याची तयारी आहे, असं अजित डोवाल म्हणाले. 

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची विविध देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत चर्चा-

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची विविध देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मार्को रुबियो, इंग्लंडचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोनाथन पॉवेल, सौदी अरेबियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मुसैद अल ऐबान, संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शेख तहनून, संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव जनरल अली अल शम्सी, जपानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मासातका ओकानो यांच्यासोबत अजित डोवाल यांनी चर्चा केली. 

भारताच्या एअर स्ट्राईकनंतर डोनाल्ड ट्रम्प काय म्हटले?

भारतानं जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला आहे. यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानमध्ये भारताचे एअरस्ट्राईक इट इज शेम अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे. दोन्ही देशांनी तणाव कमी करावा, असा आग्रह त्यांनी केला आहे. ऑपरेशन सिंदूर बाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की मी याबाबत ऐकलेय, इट इज शेम, अपेक्षा आहे की हे लवकर समाप्त होईल. कोणत्याही दोन बलवान देशांना युद्धाच्या मार्गावर जाताना पाहू शकत नाही. या दोन्ही देशांचा इतिहास जुना असून तणाव वाढलेला आहे. मात्र, जगाला युद्ध नकोय शांतता पाहिजे, असं ट्रम्प म्हणाले.  हे लवकर संपेल अशी आशा बाळगतोय, असं ट्रम्प म्हणाले.

भारताकडून कोणत्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक?

बहावलपूर, मुरीदके, सवाई, गुलपूर, बिलाल, कोटली, बरनाला, सरजाल, महमूना या ठिकाणांवर भारताकडून एअर स्ट्राईक करण्यात आला. 

संबंधित बातमी:

Operation Sindoor: हल्ल्यापूर्वी आणि नंतर, जैशचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त, पाकिस्तानची अवस्था दाखवणारे 10 फोटो!

Operation Sindoor: मध्यरात्री 1.05 वाजता पाकिस्तानात घुसले, 1.30 वाजता मिशन पूर्ण केले; 23 मिनिटांत खेळ खल्लास; भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ची A टू Z माहिती