Suchata Chuangsri Miss World 2025 : हैदराबाद येथे झालेल्या 72 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत थायलंडच्या ओपल सुचाता हिला 'मिस वर्ल्ड 2025'चा खिताब पटकावला आहे. असे विजेतेपद पटकावणारी ती थायलंडची पहिलीच स्पर्धक ठरली. गतसालची मिस वर्ल्ड क्रिस्टीना पिजाकोवा हिने ओपल सुचाताच्या मस्तकी मिस वर्ल्डचा क्राऊन ठेवला.
तेलंगणातील हायटेक्स एक्झिबिशन सेंटरमध्ये 31 मे रोजी मिस वर्ल्डचा अंतिम सामना रंगला. त्यामध्ये इथिओपिया, पोलंड आणि मार्टिनिकमधील स्पर्धकांना हरवून ओपल सुचाता हिने मिस वर्ल्डचा मुकुट जिंकला.
थायलंडच्या ओपल चुआंगश्री उर्फ सुचाता चुआंगश्री हिने मिस वर्ल्ड 2025 चा किताब जिंकून इतिहास रचला आहे. अशी कामगिरी करणारी ती थायलंडची पहिलीच स्पर्धक आहे. तिच्या या यशानंतर थायलंडमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
Who Is Opal Suchata Chuangsri : कोण आहे ओपल सुचाता चुआंगश्री?
तिचा जन्म 20 मार्च 2003 रोजी फुकेत शहरात झाला. ओपल सध्या थायलंडच्या प्रतिष्ठित थम्मासात विद्यापीठात आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करत आहे. ती थाई, इंग्रजी आणि चिनी भाषांमध्ये प्रवीण आहे.
ओपलने यापूर्वी अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत. तिने मेक्सिको सिटीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय मिस युनिव्हर्स 2024 मध्ये भाग घेतला होता. त्यामध्ये ती तिसरी उपविजेती होती. यानंतर तिने मिस वर्ल्ड थायलंड 2025 चा मुकुटही जिंकला होता. आता मिस वर्ल्ड मुकुटावर तिने आपलं नाव कोरलं आहे.
Miss World 2025 Top 3 : टॉप 3 स्पर्धक कोण?
'मिस वर्ल्ड 2025' स्पर्धेत इथिओपियाची हसेट डेरेजे हिने पहिली रनर-अपचा खिताब जिंकला. पोलंडची माजा क्लाज्दा दुसरी रनर-अप ठरली. तर मार्टिनिकची ऑरेली जोआकिम तिसरी रनर-अप ठरली.
यंदाच्या स्पर्धेत जगभरातून 108 स्पर्धकांनी भाग घेतला होता. भारतातील मॉडेल नंदिनी गुप्ताही या सौंदर्य स्पर्धेत सहभागी झाली होती. ती मिस वर्ल्डच्या अंतिम फेरीत टॉप 20 मध्ये होती. परंतु ती टॉप 8 मध्ये तिला स्थान मिळालं नाही.
हैदराबादमध्ये झालेल्या 72 व्या मिस वर्ल्डच्या जज पॅनेलमध्ये अभिनेता सोनू सूदचा समावेश होता. त्याला मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर, राणा दग्गुबती, नम्रता शिरोडकर आणि चिरंजीवी यांनीही 'मिस वर्ल्ड 2025' च्या अंतिम फेरीत हजेरी लावली. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनीदेखील या स्पर्धेत हजेरी लावली.