पटना : राज्यासोबतच बिहारमध्येही बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे बिहारमध्ये बारावीत केवळ 35 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. तर 65 टक्के विद्यार्थी बारावीत नापास झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या निकालात मोठी घसरण झाली आहे.
बिहारमध्ये 12 लाख 40 हजार 168 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ज्यापैकी केवळ 4 लाख 35 हजार 233 विद्यार्थीच पास झाले. विज्ञान, वाणिज्य आणि कला या तिन्हीही शाखेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात नापास झाले आहेत.
विज्ञान शाखेतून 86.2 टक्के गुणांसह खुशबू कुमारी ही विद्यार्थीनी राज्यात पहिली आली आहे. वाणिज्य शाखेतून पटना येथील प्रियांशू आणि कला शाखेतून गणेश या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला होता.
दरम्यान बिहारमध्ये बारावीच्या निकालानंतर जोरदार राजकारण सुरु झालं आहे. भाजपने शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर निकाल समाधानकारक असल्याचा दावा शिक्षण मंत्र्यांनी केला आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना जुलैमध्ये पुन्हा एकदा संधी देण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आर. के. महाजन यांनी दिली आहे.