छत्तीसगड : सध्या ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून फसवणूक होत असल्याच्या अनेक घटना या समोर येत आहेत. छत्तीसगडमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेच्या अकाऊंटवरुन 3 लाख रुपये अचानक गायब झाले आहेत. विशेष म्हणजे यासाठी कुठलाही ओटीपी किंवा पिन नंबरचीही मागणी केली गेली नव्हती. पोलिसांनी याबाबत तपास करताच एका गेमच्या माध्यमातून हे पैसे लंपास झाल्याच समोर आलं.  


छत्तीसगडच्या कांकेरमधील एक महिला एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या असता त्यांच्या बँक खात्यामध्ये फक्त 9 रुपये शिल्लक असल्याचं समोर आलं. या महिलेच्या खात्यातून 3 लाख 22 हजार रुपये लंपास झाले होते. विशेष म्हणजे कोणताही फसवणूक होईल असा कॉल त्यांना आलेला नव्हता. तसेच ओटीपी, एटीएम पिन नंबरही त्यांच्याकडून कधी मागितला गेला नव्हता. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर त्यांना धक्काच बसला आणि त्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली.  


संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असता एका ऑनलाईन गेमच्या माध्यमातून हे पैसे खात्यातून काढण्यात आल्याचं समोर आलं, विशेष म्हणजे हे पैसे काढण्यासाठी तब्बल 287 वेळा व्यवहार करण्यात आले होते.  


या महिलेला एक 12 वर्षांचा मुलगा आहे. त्याला फ्री फायर या ऑनलाईन गेमचे प्रचंड व्यसन लागले होते. मोबाईलच्या माध्यमातून तो सतत हा गेम खेळायचा. गेमसाठीच्या आर्थिक व्यवहारांसाठी त्याने आईचे बँक अकाऊंट लिंक केले होते. तो गेममध्ये हत्यारे खरेदीसाठी या बँक अकाऊंटचा वापर करायचा. यातूनच त्याने तब्बल 287 वेळा व्यवहार करत 3 लाख 22 हजार रुपये खर्च केले.


तुम्ही काय कराल?


तुमची मुले गेम खेळत असतील तर त्यात डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या माहितीची आवश्यकता आहे का हे नक्की बघा. अनेक वेळा गेम खेळतांना नेक्स्ट लेव्हलला पोहोचण्यासाठी किंवा पॉवर वाढवण्यासाठी मुलांकडे अशी माहिती किंवा बँक डिटेल्स मागितले जाते. एकदा का ही माहिती दिली गेली की बाय नाऊ किंवा क्लिक नाऊ असे ऑप्शन दिले जाऊन पैसे काढले जातात. ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून अशा अनेक प्रकारे फसवणूक केली जाते.


पैसे कमावण्यासाठी असे गेमिंग अप्स म्हणा किंवा सायबर गुन्हेगार अनेक शक्कल लढवतात आणि नागरिक त्यांच्या जाळ्यात अगदी सहजपणे अडकतात. लहान मुलांच्या हातात मोबाईल देत असाल तर त्यांच्याकडे बारीक लक्ष ठेवा असे आवाहन अनेक वेळा सायबर पोलिसांकडून केले जाते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले की असे फसवणुकीचे प्रकार समोर येतात आणि कष्टाच्या कमाईचे पैसे काही सेकंदात गायब होतात त्यामुळे पालकांनो वेळीच जागे व्हा.