Online Game Ban:  ऑनलाईन गेम्सच्या (Online Games) माध्यमातून धर्मांतराच्या प्रकरणानंतर आता केंद्र सरकार ऑनलाईन गेम्सवर कठोर पावलं उचलणार आहे. केंद्र सरकार सध्या तीन प्रकारच्या ऑनलाईन गेम्सवर बंदी घालण्याची तयारी सध्या सुरु करत असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच या गेम्सवर बंदी घालण्यासाठी केंद्राकडून नियमावली देखील ठरवण्यात आली आहे. त्यामुळे जर अशा गेम्सवर केंद्र सरकारने बंदी घातली तर सट्टा खेळणाऱ्यांचे बरेच नुकसान होण्याची शक्यता आहे.


केंद्रीय आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले की, "आम्ही ऑनलाईन गेम्सच्या संदर्भात एक नियमावली तयार केली आहे. त्याअंतर्गत आम्ही तीन प्रकारच्या गेम्ससाठी परवानगी देणार नाही. यामध्ये सट्टेबाजी असलेले गेम्स, ज्या गेम्समुळे नुकसान होऊ शकते आणि ज्या गेम्सचे व्यसन लागू शकते, अशा प्रकारच्या गेम्सवर बंदी घालण्यात येईल."  


ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून धर्मांतराला प्रोत्साहन 


नुकतचं गाझियाबादमध्ये ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून धर्मांतर झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणाचे थेट कनेक्शन महाराष्ट्राशी जोडले गेले. कारण यामधील एक आरोपी शहानवाज हा मुंब्र्यात राहणारा होता. ठाणे पोलिसांनी त्याला अलिबागमधून अटक देखील केली आहे. शहानवाज ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून मुलांचे धर्मांतर करणारे रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. एका 17 वर्षाच्या मुलाचे धर्मांतर केल्याचा आरोप शहानवाजवर करण्यात आला. शहानवाज हा ऑनलाईन गेम डेव्हलपर होता. तो गेम्सच्या माध्यमातून मुलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होता. 


त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आता केंद्राकडून कठोर पावलं उचलण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळे अशा प्रकरणास आळा बसण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन गेम्सचे मुलांना लागणारे व्यसन या दृष्टीने देखील केंद्राचं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता केंद्राचा हा निर्णय कितपत फायदेशीर ठरेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. 






महत्त्वाच्या इतर बातम्या :


Conversion Case: धर्मांतर प्रकरणातील आरोपी शहानवाजचा ताबा गाझियाबाद पोलिसांकडे, तीन दिवसांनंतर स्थानिक कोर्टात हजर करण्याचे आदेश