मुंबई : पंढरपूर हे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. अनेक वर्षांपासून राज्यभरातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी इथे येतात. असं असताना मंदिरात अस्पृश्य मानल्या जाणाऱ्यांना प्रवेश नव्हता. कित्येक शतके हे असंच सुरु होतं. मात्र याविरोधात साने गुरुजी यांनी आवाज बुलंद केला. त्यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्व जातीच्या लोकांना खुले करण्यासाठी 1 मे 1947 ते 10 मे 1947 या काळात उपोषण केलं होतं. यानंतर अखेर 11 नोव्हेंबर 1947 मध्ये पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्व जातीच्या लोकांसाठी करण्यात आले. आजच्याच दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. मौलाना आझाद हे एक प्रख्यात शिक्षणतज्ञ होते आणि त्यांनी 15 ऑगस्ट 1947 ते 2 फेब्रुवारी 1958 पर्यंत स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून काम केले. 


1926: विनोदी अभिनेता बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ जॉनी वॉकर यांचा जन्म. (मृत्यू: 29 जुलै 2003)


11 नोव्हेंबर 1926 रोजी इंदूरमध्ये जन्मलेल्या वॉकर यांचे खरे नाव बदरुद्दीन जमालुद्दीन काझी होते. अभिनयाच्या विश्वात प्रवेश केल्यावर गुरु दत्त यांनी त्यांचं नाव बदलले. गुरू दत्त यांनी त्यांचे नाव एका प्रसिद्ध दारूच्या ब्रँडवरून ठेवले. पण खास गोष्ट म्हणजे चित्रपटांमध्ये जॉनी वॉकर अर्थातच मद्यपीच्या भूमिकेत असायचे, पण खऱ्या आयुष्यात त्यांनी दारूला कधी हात लावला नाही. 'बाजी' चित्रपटात तो पहिल्यांदाच दिसले. त्यानंतर जॉनी वॉकर यांनी गुरु दत्त यांच्या 'आर-पार', 'प्यासा', 'चौदहवीं का चांद', 'कागज के फूल', 'मिस्टर अँड मिसेस 55' या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.


1936: हिंदी, नेपाळी व बंगाली चित्रपट अभिनेत्री माला सिन्हा यांचा जन्म


हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने पडद्यावर छाप सोडणारी सुंदर आणि ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1936 रोजी कोलकाता येथे झाला. माला सिन्हा या साठ आणि सत्तरच्या दशकातील अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांसोबत काम करून खूप नाव कमावले. माला सिन्हाने हिंदीशिवाय बंगाली आणि नेपाळी चित्रपटांमध्येही काम केले आहे. माला सिन्हा यांनी बालकलाकार म्हणून अभिनय विश्वात प्रवेश केला. त्यांनी सुरुवातीला अनेक बंगाली आणि नेपाळी चित्रपटांसाठी काम केले होते. माला सिन्हा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील बादशाह चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांचा चित्रपट 1954 साली आला होता. यानंतर माला सिन्हा यांनी प्यासा, धूल के फूल, अनपढ, दिल तेरा दिवाना, आँखे, गीत और ललकार यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले.


1975: अंगोला देशाला स्वातंत्र्य मिळाले.


अंगोला हा दक्षिण-पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे, जो अटलांटिक समुद्राला लागून आहे. अंगोलामध्ये पेट्रोलियम तेल आणि सोने यासारख्या खनिजांचे साठे आहेत. आजच्याच दिवशी या देशाला स्वातंत्र्य मिळाले.


1994: ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ कुवेम्पू यांचे यांची पुण्यतिथी.


1997: चित्रपट अभिनेते यशवंत दत्तात्रय महाडिक ऊर्फ यशवंत दत्त यांची पुण्यतिथी.