Omicron Variant Cases in India : देशात ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या वाढतच चालली आहे. आज महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. देशातील एकूण ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या 37 वर पोहचली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्याशिवाय नागपूर, चंदीगढ आणि कर्नाटकमध्येही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. देशातील ओमायक्रॉन व्हेरियंटची संख्या 37 इतकी झाली आहे.  


आयरलँडमधून आंध्र प्रदेशमध्ये आलेल्या एका विदेशी नागरिकाला ओमायक्रॉन व्हेरियंट झालाय. आंध्र प्रदेशमधील हा पहिला रुग्ण आहे. हा 34 वर्षीय व्यक्ती सर्वात आधी मुंबईत आला होता. त्यावेळी त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. त्यानंतर 27 नोव्हेंबर रोजी त्या व्यक्तीला प्रवासासाठी परवानगी देण्यात आली होती. विजयनगरमध्ये त्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्या व्यक्तीचे नमुने हैदराबादला पाठवले. त्यामध्ये त्या व्यक्तीला ओमायक्रॉन झाल्याचं स्पष्ट झालेय. 
 
रविवारी कर्नाटकमध्येही ओमायक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण आढळलाय. हा राज्यातील तिसरा रुग्ण आहे. दक्षिण आफ्रिकामधून आलेल्या 34 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचं स्पष्ट झालेय. या व्यक्तीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या व्यक्तीच्या संपर्कातील लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, इटलीमधून चंदीगढमध्ये परतलेल्या एका 20 वर्षीय तुरुणालाही ओमायक्रॉनची लागण झाली आहे. या तरुणांमध्ये कोणतीही लक्षणं नव्हती. तरुणाच्या कुटुंबातील व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. 


नागपूरमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव - 
मुंबई आणि पुण्यानंतर ओमायक्रॉन या व्हेरियंटने उपराजधानी नागपूरमध्ये शिरकाव केलाय. नागपूर महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. नागपूरमध्ये 40 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचं त्यांनी सांगितलं. ओमायक्रोन पॉसिटीव्ह आढळलेल्या 40 वर्षीय रुग्णाचा पश्चिम आफ्रिकेतील प्रवासाचा इतिहास आहे. हा व्यक्ती नागपुरात परतल्यानंतर त्याची कोरोना चाचणीसह जीनोम सिक्वेन्सिंग ही करण्यात आली होती. त्यानंतरच त्याला ओमायक्रोन संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णाची प्रकृती स्थिर असून तो रुग्णालयात उपचार घेतोय. संबंधित रुग्णाच्या कुटुंबातील इतर सदस्य निगेटिव्ह आले आहेत. त्यांनाही विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. संबंधित रुग्णच्या संपर्कातील इतर लोकांची ट्रेसिंग केली जात असून त्यांच्या सर्वांच्या चाचण्या प्रशासनाकडून केल्या जाणार आहेत. चार डिसेंबर रोजी संबधित व्यक्तीचे नागपूर विमानतळावर नमुने घेतले होते. यामध्ये तो कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले होते. जनुकीय चाचणीत (जिनोम सिक्वेन्सिंग) त्याला ओमायक्रॉन असल्याचे निदान झाले आहे. 


महाराष्ट्रातील ओमायक्रॉन व्हेरियंटची संख्या -
नागपूरमध्ये रविवारी ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केलाय. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार दक्षिण आफ्रिकेहून आलेला नागपूर येथील  ओमायक्रॉन बाधित आढळलेला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 18 इतकी झाली आहे. यामध्ये मुंबईत 5, पिंपरी चिंचवडमध्ये 10, पुणे मनपामध्ये एक, कल्याण डोंबिवली 1 आणि नागपूरमध्ये एक असे रुग्ण आढळले आहेत. 18 पैकी 9 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. नऊ रुग्णांची  आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live