नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचा गुडविल अॅम्बेसेडर म्हणून सचिन तेंडुलकर आणि संगीतकार ए. आर रहमान यांना विनंती करण्यात आली आहे. अभिनेता सलमान खानला रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचा गुडविल ब्रॅण्ड अम्बेसेडर बनवल्याने प्रचंड वाद सुरु आहे. त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघाने सचिन आणि ए आर रहमान यांना गुडविल ब्रॅण्ड अम्बेसेडर बनण्याची विनंती केली आहे.


 

आयओएने सचिन तेंडुलकर आणि ए आर रहमान यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. मात्र सचिन किंवा रहमानकडून अद्याप या पत्राचं उत्तर आलेलं नाही. ऑलिम्पिक संघाच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 

मात्र सदिच्छादूत पदासाठी आम्ही अनेक जणांना विचारणा करत आहोत. मात्र सलमान खानला हटवणार नाही, असं आयओएचे उपाध्यक्ष तार्लोचन सिंह यांनी सांगितलं.

 

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने नेहमीच ऑलिम्पिक खेळाडूंचा उत्साह वाढवला आहे. त्याने अनेक खेळाडूंची मदतही केली आहे. 2014 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धांनंतर सरिता देवीचं निलंबन रद्द करण्यातही सचिनने महत्त्वाची भूमिका बजावली होती, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

 

भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अधिकाऱ्यां माहितीनुसार, दिग्गज व्यक्तिमत्त्व रिओ ऑलिम्पिकशी जोडले गेले तर खेळांकडे जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करता येईल. तसंच खेळांना प्रोत्साहन मिळेल आणि कॉर्पोरेट फंडिंग उपलब्ध होईल.