नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन केल्यानंतर, त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. इतकंच नाही तर आगामी काळात भाजपचा वारु रोखण्यासाठी, भाजपविरोधी पक्ष एकत्र आल्यास, नितीश कुमार हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असं पवार यांनी म्हटलं आहे.
याशिवाय भाजपविरोधात जर विरोधी पक्ष एकत्र येत असतील, तर त्याला राष्ट्रवादीचाही पाठिंबा असेल, असंही पवारांनी घोषीत केलं.
"आगामी काळात भाजपचा वारु रोखण्यासाठी, भाजपविरोधी पक्ष एकत्र आल्यास, त्याची धुरा सांभाळण्यासाठी नितीश कुमार प्रमुख दावेदार असतील. येत्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी नितीश कुमारच पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतील. कारण संघटीत विरोधी पक्षांमध्ये नितीश कुमार हा एकमेव पात्र चेहरा आहे", असं पवार म्हणाले.
इंग्रजी वृत्तपत्र 'द इकॉनॉमिक टाईम्स' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पवारांनी आपलं मत मांडलं.
पवार म्हणाले, "भारतात आज जर विरोधी पक्षांना एकत्र येऊन, काही पर्याय द्यायचा असेल, तर त्यांच्यासमोर नितीश कुमार हे पहिलं नाव आहे. काँग्रेसकडे तसा चेहरा नाही. नितीश कुमार सध्या बिहारचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे तसं नेतृत्व आहे. जर भाजपविरोधी पक्ष एकत्र आले, तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असेल".
लोकसभेच्या 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेससोबत आघाडी करुन निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादीचे केवळ चारच खासदार निवडून आले. तर महाराष्ट्रात काँग्रेसला केवळ दोन जागांवरच समाधान मानावं लागलं होतं.
तर तिकडे नितीश कुमार यांनीही भाजपची साथ सोडून एकट्याच्या बळावर निवडणूक लढवली होती. त्यांचे दोन उमेदवार निवडून आले.
मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातून सत्तेतून पायउतार झाली. तर तिकडे नितीश कुमार यांनी लालूंच्या साथीने बिहारमध्ये पुन्हा सत्ता स्थापन करून, भाजपचा विजयाचा वारू रोखला.
पवार नितीश कुमारांचे प्रशंसक
शरद पवार हे नितीश कुमारांचे पूर्वीपासूनचे प्रशंसक आहेत. विधानसभा निवडणुकीत नितीश-लालू यांचाच विजय होईल, असा विश्वास पवारांनी त्यावेळी व्यक्त केला होता.
त्यामुळे पवारांनी नितीश कुमारांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबद्दल केलेलं वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे.
सोनियांचंही कौतुक
दुसरीकडे पवारांनी सोनिया गांधींचंही कौतुक केलं आहे. विरोधी पक्षांमध्ये सोनिया गांधी सर्वमान्य नेत्या आहेत. सोनियाही सर्वांन सोबत घेऊन जाणाऱ्या आहेत, असं पवार म्हणाले.
राहुल गांधींबाबत
यावेळी शरद पवारांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींबाबत अधिक बोलणं टाळलं. राहुल गांधी सध्या विविध राज्यांचा दौरा करत आहेत, इतकंच बोलून पवारांनी विषय टाळला.
मायावतींना विजय मिळेल
उत्तर प्रदेशात 2017 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला बहुमत मिळेल, असा विश्वास यावेळी पवारांनी व्यक्त केला.
केजरीवालांचं केवळ नाव ऐकलं
शरद पवारांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला. पवारांनी अरविंद केजरीवाल यांना नाकारून, केजरीवालांना कोणीही ओळखत नाही, केवळ त्यांचं नाव ऐकलंय, असं पवार म्हणाले.