Odisha train crash: ओडिशामधील बालासोरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात (Railway Accident) अनेक जण गंभीर जखमी झाले, तर अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, शुक्रवारी (2 जून) ओडिशातील रेल्वे दुर्घटनेत कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनने मेन लाइनऐवजी लूप लाइनमध्ये प्रवेश केला आणि बहानगर बाजार स्थानकाच्या पुढे उभ्या असलेल्या मालगाडीला धडक दिली. मागून आलेल्या बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसला सिग्नल न मिळाल्याने तिचेही डबे शेजारच्या रुळावर विखुरलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या डब्यांवर आदळल्यानंतर उलटले.
कोरोमंडल एक्स्प्रेस 128 किमी प्रतितास वेगाने धावत होती, तर बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस 116 किमी प्रतितास वेगाने धावत होती. हा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रेल्वेच्या लूप लाईन्स स्टेशन परिसरात बांधल्या गेल्या आहेत. एकाहून अधिक इंजिनांसह पूर्ण लांबीची मालगाडी सामावून घेण्यासाठी लूप लाइनची लांबी साधारणपणे 750 मीटर असते.
या दोन्ही गाड्यांमध्ये सुमारे 2,000 प्रवासी होते. या दुर्घटनेत 288 लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास 1,000 लोक जखमी झाले आहेत. या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, अनुभव दास यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं की, स्थानिक अधिकारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कोरोमंडल एक्स्प्रेस मालगाडीला धडकली होती. मात्र, या गोष्टीला रेल्वेने अधिकृतपणे दुजोरा दिला नाही.
नॅशनल ट्रान्सपोटर्सने ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त या विभागाची चौकशी करतील.
नॅशनल ट्रान्सपोटर्सने असंही म्हटलं आहे की, या मार्गावर रेल्वे टक्करविरोधी प्रणाली कवच उपलब्ध नव्हते. या अपघातात बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीचा समावेश आहे. ट्रेनच्या या अपघातात बचाव कार्य पूर्ण झालं आहे.
या मार्गावर कवच उपलब्ध नव्हते, असे भारतीय रेल्वेचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी सांगितलं. रेल्वे सर्व नेटवर्कवर कवच आणि ट्रेन टक्करविरोधी यंत्रणा बसवण्याच्या तयारीत आहे. जेव्हा लोको पायलट सिग्नल तोडतो, तेव्हा रेल्वेचा हा कवच अलर्ट देतो. ही प्रणाली लोको पायलटला अलर्ट करू शकते, ब्रेक्सवर नियंत्रण ठेवू शकते आणि ठराविक अंतरावर त्याच मार्गावर दुसरी ट्रेन दिसल्यावर ट्रेन आपोआप थांबवू शकते.
या अपघातामागे सिग्नलिंग बिघाड हे कारण असू शकतं, असं सूत्रांनी सांगितलं असलं तरी, रेल्वे अधिकाऱ्यांनी कोरोमंडल एक्स्प्रेसने लूप लाइनमध्ये प्रवेश केला आणि थांबलेल्या मालगाडीला धडक दिल्याचं सांगितलं. पण, कोरोमंडल ट्रेनने आधी मालगाडीला धडक दिली की ट्रेन आधी रुळावरून घसरली आणि नंतर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसचे नेतृत्व करणारे सुधांशू मणी यांनी या दुर्घटनेत सहभागी असलेल्या दोन लोको पायलटची कोणतीही चूक नसल्याचं म्हटलं. सिग्नल हिरवा असल्याने लोको पायलट योग्य मार्गावर जात होते, असे मणी म्हणाले.
फेब्रुवारीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये दोन मालगाड्यांमध्ये झालेल्या अपघातावेळी रेल्वेने लोको पायलटवर कारवाई केली होती.
ट्रॅफिक आणि रेल्वे बोर्डचे माजी सदस्य श्री. प्रकाश यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलं आहे. त्यांनी म्हंटलं की, मागून इतक्या वेगाने येणारा दुसऱ्या ट्रेनचा चालकसुद्धा अपघात वाचवण्यासाठी फारसं काही करु शकला नसता. ड्रायव्हरला ब्रेक लावण्यासाठी आणि ट्रेन थांबवण्यासाठी किती वेळ आहे आणि ट्रेनचा वेग किती आहे, यावर सर्व अवलंबून आहे. पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरणं ही दुर्मिळ घटना आहे, तर मालगाड्यांमध्ये हा प्रकार सर्वात सामान्य आहे. त्यामुळे रुळावरून ट्रेन घसरण्याचं कारण तपास करणार्यांना काय सापडलं ते महत्त्वाचं असेल, असं ते म्हणाले.
हेही वाचा: