Odisha Train Accident: शुक्रवारी 2 जून रोजी ओडिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात  (Odisha Train Accident) 278 प्रवाशांचा मृत्यू झाला. दोन एक्स्प्रेस आणि एका मालगाडीचा अपघात झाला होता. या भीषण रेल्वे अपघातामागील कारणे  समोर येत असून इतर महत्त्वाची माहिती समोर येऊ लागली आहे. या अपघातातील जवळपास 40 जणांचा मृत्यू हा विजेच्या धक्क्यामुळे झाला असल्याचे म्हटले जात आहे. हे प्रवासी कोरोमंडलमधून प्रवास करत होते.


रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये (Coromandel Express) सापडलेल्या सुमारे 40 मृतदेहांवर जखमांच्या कोणत्याही खुणा नाहीत. त्यांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बालासोर येथील रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये (GRP) एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे. त्यामध्ये ही बाब नमूद करण्यात आली असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. 


रेल्वे पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, हा अपघात घडला तेव्हा थेट ओव्हरहेड वायर तुटून काही डब्यांमध्ये अडकली. त्यामुळे प्रवाशांना विजेचा मोठा धक्का बसला असल्याचे म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक पी कुमार नायक यांनी त्यांच्या एफआयआरमध्ये म्हटले  की, “अनेक प्रवासी अपघातात जखमी झाल्याने मृत्यूमुखी पडले. ओव्हरहेड एलटी (कमी दाबाची) लाईनच्या संपर्कात आल्यावर विजेचा धक्का बसला. तिहेरी रेल्वे अपघातादरम्यान रेल्वेचे डबे उलटले. यातच ओव्हरहेड वायरला धक्का बसला, शिवाय रुळालगत असलेल्या विजेच्या खाबांना धक्का बसला. 


या भीषण अपघातात 278 जणांचा मृत्यू झाला आणि 1200 जखमी झाले. हावडा-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडी अपघातग्रस्त झाल्या. कोरोमंडल एक्स्प्रेसने लूप लाइनवर असलेल्या मालगाडीवर धडक दिली. या धडकेने कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे उलटले आणि हे डबे बाजूच्या रेल्वे रुळावरून जात असलेल्या बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेसला धडकले. शुक्रवारी, सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच, तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. 


सीबीआयने तपास हाती घेतला


सीबीआयने मंगळवारी बालासोर रेल्वे अपघाताचे प्रकरण तपासासाठी स्वत: कडे घेतले आहे. रेल्वे अपघाताची चौकशी सीबीआयकडून करण्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली होती. रेल्वे बोर्डाने सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. आज सीबीआयच्या पथकाने अपघात स्थळाची पाहणी केली. रेल्वे रुळ आणि सिग्नल रुमचे निरीक्षण केले. 


इतर महत्त्वाची बातमी: