Odisha Train Accident: ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातावर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघाताच्या घटनेने दुःखी असल्याचे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. या अपघातात जखमी झालेले प्रवासी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. अपघातस्थळी बचावकार्य सुरू असून बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे.



राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी यांनीदेखील अपघातावर शोक व्यक्त केला आहे. रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यूची माहिती कळताच  अतीव दु:ख झाले असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले. 


 






कोरोमंडल एक्स्प्रेस कोलकाताजवळील शालीमार स्थानकावरून चेन्नई सेंट्रलला जात असताना बहनगा बाजार स्थानकावर हा अपघात झाला. या अपघातात 50 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर सुमारे 200 प्रवासी जखमी झाले आहेत.






घटनेनंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक नियंत्रण कक्षात पोहोचले. ते म्हणाले की, या भीषण रेल्वे अपघाताच्या परिस्थितीचा मी नुकताच आढावा घेतला आहे. उद्या सकाळी, शनिवारी घटनास्थळी भेट देणार असल्याचे मुख्यमंत्री पटनायक यांनी म्हटले. 


ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितले की, एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी आहे. 600-700 बचाव दलाचे जवान काम करत आहेत. रात्रभर बचावकार्य सुरू राहणार आहे. सर्व रुग्णालये सहकार्य करत आहेत. पीडितांना वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. 


बालासोरमधील बहनगा स्टेशनजवळ शुक्रवारी संध्याकाळी हा अपघात झाला. एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात झालेली धडक इतकी भीषण होती की, कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून उतरली. सध्या या मार्गावरून जाणारी रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे. अपघातात 50 जणांचा मृत्यू झाला असून 132 हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.