नवी दिल्ली : आयकर परतावा भरताना एक चूकही तुम्हाला महागात पडू शकते. टॅक्स वाचवण्याच्या नादात चुकीचा आयटी रिटर्न भरल्यास करदात्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. फक्त दंडात्मक कारवाईच नाही, तर तुम्हाला तुरुंगवारीही घडू शकते.

पगारदार कर्मचाऱ्यांना चुकीचा आयकर परतावा फाइल न करण्याचा इशारा आयकर विभागाने दिला आहे. अशा करदात्यांविरोधात कारवाई केली जाईल, तर त्यांच्या कंपनी मालकांनाही त्याबाबत माहिती दिली जाणार आहे.

आयकर परताव्यात उत्पन्न कमी दाखवणं किंवा कपात वाढवून दाखवणं यासारख्या 'शक्कल' न लढवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आयकर विभागाच्या बंगळुरुतील मध्यवर्ती कार्यालयामार्फत करदात्यांना यासंदर्भात सूचना जारी करण्यात आली आहे.

बनावट करसल्लागारांच्या जाळ्यात अडकू नका. परताव्यात उत्पन्न कमी दाखवणं किंवा कपात वाढवून दाखवणं असे प्रकार नियमांनुसार दंडनीय आहेत आणि आयकर कायद्याच्या विविध कलमांनुसार कारवाई केली जाऊ शकते.