नवी दिल्ली : आयकर खात्यानं नोटाबंदीनंतर जमा न झालेल्या 1550 कोटी रुपयांच्या काळ्या पैशाचा छडा लावला आहे. काळापैसा करणाऱ्या रॅकेट्स आणि बनावट कंपन्यांच्या माध्यमातून ही रक्कम बदलण्यात आली आहे. आयकर खात्याच्या अहवालानुसार हवाला व्यवहारांच्या माध्यमातून काळा पैसा तयार होत आहे. काळ्या पैशाचं रॅकेट चालवणाऱ्या लोकांनी 8 नोव्हेंबरनंतर 930 कोटींची रक्कम बेकायदेशीररित्या हस्तांतरीत करण्याचा प्रयत्न केला होता.
दिल्लीतील आणखी एका प्रकरणात आयकर खात्यानं 80 बँक खात्यातून 200 कोटी रुपयांची रक्कम काळ्याची पांढरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळवली आहे. अहवालानुसार याप्रकरणी नोएडातील एका बँकेतील 100 खात्यांची चौकशी सुरु आहे. नोएडातील या 100 खात्यांच्या माध्यमातून 200 कोटी रुपये काळ्याचे सफेद करण्यात आले आहेत.
दरम्यान आयकर खात्यानं याप्रकरणी एंट्री ऑपरेटर आणि हवाला व्यवहार करणाऱ्यांविरोधात कोलकाता, गुरगाव, चरखी दादरी आणि कर्नाटकच्या चित्रदुर्गमध्ये कारवाई करत आणखी 200 कोटींच्या काळ्या पैशाचा छडा लावला आहे.