मुंबई : मागील काही काळापासून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची रिघ सर्वांच्याच मागे लागली आहे. जीवनातील मोठ्या संघर्षाच्या काळाला सारेजण सामोरे जात आहेत, ज्यामध्ये किंचितसाही हलगर्जीपणा धोक्याच्या दरीत ढकलू शकतो. याच धर्तीवर कोरोनापासून दूर राहण्यासाठी म्हणून प्रशासनाकडून अनेक कठीण निर्बंध लागू करण्यात येत आहेत. मग ते सुरक्षित अंतर पाळणं असो किंवा मास्कचा वापर बंधनकारक करणं असो.
सध्या विमानप्रवास करणाऱ्या अशाच प्रवाशांसाठी काही निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. ज्याचं पालन न केल्यास तुमची विमानातून हकालपट्टीही होऊ शकते. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे, पण जर कोणीही विमानात योग्य पद्धतीने मास्क वापरताना आढळलं नाही, किंवा तो चुकीच्या पद्धतीने वापरला तर अशा प्रवाशांना शिक्षा म्हणून थेट विमानातूनच उतरवण्यात येणार आहे.
Directorate General of Civil Aviation कडून ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती देण्यात आली. ज्यामध्ये नियमांचं पालन न करणाऱ्या प्रवाशांना शिक्षेला सामोरं जावं लागेल असं सांगण्यात आलं.
दिल्ली उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशांनुसार DGCAनं हनुवटीवर किंवा कोणत्याही चुकीच्या प्रकारे मास्क घातलेले प्रवासी दिसल्यास त्यांना तात्काळ विमानातून बाहेरची वाट दाखवावी.
कोरोना देशात शिरकाव होण्याच्या घटनेला जवळपास वर्षभराचा काळ उलटून गेला. त्यातच मागील काही महिन्यांमध्ये कोरोना नियंत्रणात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच पुन्हा एकदा या संसर्गानं डोकं वर काढलं जिथे डिसेंबर महिन्यानंतर पहिल्यांदाच भारतात मार्च महिन्यात रुग्णसंख्या 20 हजारांहूनही अधिकच्या आकड्यानं वाढली. नव्यानं कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा हा आकडा पाहता, अनेक भागांमध्ये लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे.