जयपूर : इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर केद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे. मंत्री असल्यामुळे मला पेट्रोल-डिझेल फुकटात मिळतं, मंत्रिपद गेल्यावर इंधन दरवाढीचा फटका बसेल, असं रामदास आठवले म्हणाले.

'मंत्री असल्यामुळे मला इंधनभत्ता मिळतो. त्यामुळे इंधन दरवाढीची झळ मला बसलेली नाही. मात्र मंत्रिपद गेल्यावर मला पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांचा नक्कीच फटका बसेल' असं आठवले म्हणाले. रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले केंद्रात सामाजिक न्याय विभागाचं मंत्रिपद भूषवत आहेत.

जयपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. इंधन दरवाढीचा फटका तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात बसला आहे का, असा प्रश्न आठवलेंना विचारण्यात आला होता.

'इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना त्रास होतो, हे मी समजू शकतो. दर कमी करणं ही सरकारची जबाबदारी आहे. राज्यांनी करकपात केली, तर हे शक्य होईल. केंद्र सरकार या प्रश्नावर काम करत आहे' असंही आठवलेंनी सांगितलं.

इंधन दरवाढीची मालिका सोळाव्या दिवशीही सुरुच आहे. पेट्रोलचे दर आज 28 पैशांनी तर डिझेलचे दर 18 पैशांनी वाढले आहेत. मुंबईत पेट्रोल प्रतिलीटर 89.30 रुपये तर डिझेल प्रतिलीटर 78.24 रुपये पैशांनी मिळत आहे. इंधन दरवाढीचा चढता आलेख कायम राहिल्यास लवकरच पेट्रोल शंभरी गाठेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.