Not Getting Good Candidates for District Judges : राजस्थानमधील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश ( ADJ - Additional District Judge ) भरतीविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. अधिसूचनेत 250 उमेदवारांची निवड करत त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात फक्त चार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं. या निकालाविरोधात प्रशांत भूषण यांनी याचिका दाखल केली. यावर उत्तर देत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjaya Chandrachud) यांनी म्हटलं आहे की, जिल्हा न्यायाधीशांसाठी चांगले उमेदवार मिळत नाही आहेत. राजस्थानमधील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश ( ADJ - Additional District Judge ) भरतीसाठी मुख्य परीक्षेत बसलेल्या वकिलांकडून परीक्षेच्या निकालाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना संबंधित उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले आहेत.
ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांनी उमेदवारांची बाजू मांडताना सांगितलं आहे की, ADJ पदासाठी 85 रिक्त जागा असूनही केवळ चार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं. कागदपत्रांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली. याचिकाकर्त्यांनी त्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन, बोनस गुण आणि नमूद मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करण्याची मागणी केली. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की पदांच्या संख्येपेक्षा 2-3 पट अधिक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले पाहिजे.
सरन्यायाधीश चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली आणि जे बी परदीयावाला यांच्या खंडपीठाने सांगितले आहे की, त्यांना ADJ पदांसाठी चांगले उमेदवार मिळत नाहीत. सर्व मुख्य न्यायाधीशांचं ( CJ - Chief Justice ) हे म्हणणं आहे. दरम्यान, खंडपीठाने यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला. खंडपीठाने म्हटले की याचिकाकर्ते संबंधित उच्च न्यायालयात जाऊ शकतात. न्यायालयाने स्पष्ट केले की, उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यास, मुख्य न्यायमूर्तींना विनंती केली जाते की, याचिका ती खंडपीठाकडे पाठवावी जेणेकरून भरती प्रक्रिया अंतिम केली जाऊ शकेल.
सरन्यायाधीशांनी काय म्हटलं?
cji चंद्रचूड यांनी म्हटलं आहे की, 'आम्हाला संपूर्ण देशभरात लॅटरल एंट्रीसाठी उमेदवार मिळत नाहीत. फक्त राजस्थानचं नाही तर संपूर्ण देशात हेच आहे. सर्व सरन्यायाधीश हेच सांगत आहेत. प्रशांत भूषण यांनी सांगितलं की, भरतीच्या माहितीपत्रकात 250 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल असं सांगण्यात आलं होतं, त्याऐवजी फक्त चार उमेदवारांना बोलावण्यात आलं. गुण देताना काही त्रुटी राहिली असेल असं सांगत, पुनर्मूल्यांकन केले जाऊ शकते अशी विनंती त्यांनी केली आहे.
राजस्थान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश भरतीबाबतच्या तक्रारी ऐकण्यासाठी एक समिती स्थापन केली होती, असंही किशोर यांनी खंडपीठाला सांगितलं. खंडपीठाने भूषण यांची बाजू ऐकून आदेश नोंदवला आहे की, भूषण यांनी उत्तरपत्रिकांचे न्यायाधीशांद्वारे पुनर्मूल्यांकन करण्याची विनंती केली आहे. यावरील निकालासाठी ते उच्च न्यायालयात जाऊ शकतात.