नवी दिल्ली : नोएडातील एका इंजिनिअरने 15 व्या मजल्यावरून उडी मारून जीव दिल्याची धक्कादायक घटना घडली. जीव देण्याआधी त्या इंजिनिअरने त्याच्या पत्नीची माफी मागितली आणि स्वतःचे पासवर्ड, बँक डीटेल्स तिला सांगितले आणि हे टोकाचं पाऊल उचललं. नोएडातील सेक्टर 75 मधील पंचशील सोसायटीमध्ये ही घटना घडली असून पोलिस त्याचा अधिक तपास करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे या इंजिनिअरने जीव देण्यापूर्वी कोणतीही सुसाईड नोट लिहिली नसल्याचं समोर आलं आहे. 


नोएडातील पंचशील सोसायटीमधील 1508 मध्ये राहणाऱ्या 36 वर्षीय पंकजने आत्महत्या केली. तो त्याची पत्नी आणि मुलांसोबत राहत होता. मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्याने ही आत्महत्या केली. वरून उडी मारल्यानंतर त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड पोहोचला पण तोपर्यंत पंकजचा मृत्यू झाला होता. 


पंकज हा नोएडातील सेक्टर 126 मधील एका कंपनीमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून काम करत होता. पोलिसांनी या घटनेनंतर सोसायटीमधील सीसीटीव्ही तपासले. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी पंकजची पत्नी जालंदरला गेली होती. या घटनेनंतर पोलिसांनी त्याच्या पत्नीला आणि नातेवाईकांना त्याची माहिती दिली. 


मेल करून पत्नीची माफी मागितली


या घटनेआधी मेसेज आणि मेलच्या माध्यमातून पंकजने त्याच्या पत्नीशी संवाद साधल्याचं समोर आलं आहे. त्यावेळी पंकजने त्याचे सर्व पासवर्ड, बँक डीटेल्स आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींची माहिती त्याच्या पत्नीला दिली होती. त्या संवादादरम्यान पंकजने त्याच्या पत्नीचा माफीही मागितल्याचं समोर आलं आहे. 


पंकज हा मूळचा जालंदरमधील असून गेल्या काही दिवसांपासून तो निराशेमध्ये असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी, सहकाऱ्यांनी आणि शेजाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला असून पंकजच्या आत्महत्येचं मूळ कारण लवकरच समोर येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. 


ही बातमी वाचा :