नवी दिल्ली : ‘दूध आणि मर्सिडीजवर एकच कर असू शकत नाही’,असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. वस्तू आणि सेवा करामध्ये (जीएसटी) एकच स्तर असावा, या काँग्रेसच्या मागणीला त्यांनी हे उत्तर दिलं आहे.


जीएसटीच्या अंमलबजावणीला वर्षपूर्ती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज भाजपकडून ‘जीएसटी दिन’ साजरा केला जात आहे.

यानिमित्त ‘स्वराज पत्रिके’ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले, “सर्वच गोष्टींना एक कर लावला जावा, ही काँग्रेसची मागणी मान्य केली तर खाण्या-पिण्याच्या गोष्टींसह अनेक जीवनावश्यक गोष्टींवरील कर मोठ्या प्रमाणात वाढेल.”

यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी जीएसटीच्या फायद्यांविषयी अनेक दावे केले. ते म्हणाले, “जीएसटीमुळे एका वर्षात अप्रत्यक्ष कर भरणाऱ्यांच्या संख्येत 70 टक्क्यांची वाढ झाली आहे. जीएसटी लागू केल्यामुळे चेकपोस्ट बंद करुन त्यामध्ये 17 विविध कर आणि 23 सेस यांचा समावेश करुन एकत्र केले गेले. जीएसटी ही वेळेनुसार अधिकाधिक चांगली होणारी प्रणाली आहे. ”

दुसरीकडे, जीएसटीच्या अंमलबजावणीवरुन माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, “जीएसटीमधील 28 टक्क्यांचा स्तर काढून टाकला जावा. जर सरकार जीएसटीमध्ये पाच वेगवेगळे स्तर ठेवणार असेल तर त्याला यापुढे त्याला ‘आरएसएस कर’ असं म्हणायला पाहिजे. ”

पेट्रोलियम पदार्थ आणि वीज यांचा जीएसमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणीही पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

सध्या जीएसटीमध्ये 0,5,12,18,28 असे पाच स्तर केंद्र सरकारकडून ठेवण्यात आले आहेत.