नवी दिल्ली : केंद्र सरकारनं झाकीर नाईकशी संबंधित एनजीओ इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या आर्थिक नाड्या आवळायला सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला अखेरची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

एफसीआरए लवकरच इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा परवानाही रद्द करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे झाकीर नाईकच्या एनजीओला परदेशातून देणगी स्वीकारता येणार नाही. झाकीर नाईकवर दहशतवाद्यांना चिथावणी दिल्याचा आरोप आहे.

इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला मिळणाऱ्या देणग्यांचा विघातक गोष्टींसाठी वापर करण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर पूर्णपणे बंदी घालण्यासाठी सरकारनं प्रयत्न सुरु केल्याची माहिती आहे.

झाकीर नाईकच्या वडिलांचं निधन, अटकेच्या भीतीने झाकीर परदेशातच


झाकीर नाईक याचे वडील अब्दुल कर्म नाईक यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मात्र, भारत सरकार आणि तपास यंत्रणाच्या भीतीनं झाकीर नाईक वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिलेला नाही.

मुंबईतल्या माझगावमधील नारियल वाडीतल्या कब्रस्तानात झाकीर नाईकचे वडील अब्दुल कर्म नाईक यांचे अंत्यविधी करण्यात आले. अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणात लोक जमले होते. मात्र, अटकेच्या भीतीनं झाकीरनं अंत्यविधीला येणं टाळलं.

दहशतवादाला खतपाणी देणं आणि धर्मपरिवर्तनाच्या आरोपांमुळे झाकीर नाईक गेल्या काही महिन्यांपासून देशाबाहेर आहे. केंद्र सरकारने झाकीर नाईकच्या संस्थेवर बंदी घातली आहे. त्यानंतर झाकीर देशात परतलाच नाही.