शिमला : "अधिकृत दस्तऐवजावर स्वाक्षरी केल्यानंतर फाईल माझ्यासमोरुन जाते तेव्हा मी पंतप्रधान नसून 'प्रधान सेवक' असतो. माझं आयुष्य आणि माझ्या आयुष्यातील सर्वकाही 130 कोटी भारतीयांसाठी आहे," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. शिमल्यातील गरीब कल्याण संमेलनात पंतप्रधान मोदी मंगळवारी (31 मे) बोलत होते.
केंद्रातील भाजप सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हिमाचल प्रदेशातील शिमला इथे भव्य रोड शो करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंगळवारी हिमाचल प्रदेशमध्ये भव्य स्वागत करण्यात आले. हिमाचल प्रदेशात या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. त्यानिमित्त त्यांनी संभेला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधानांनी केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या कामाची यादीच वाचून दाखवली. सर्जिकल स्ट्राईकचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, "2014 पूर्वी देशाच्या सुरक्षेची चिंता होती मात्र आता सर्जिकल स्ट्राईकचा देशाला अभिमान आहे."
मोदी म्हणाले, 'आजचा दिवस माझ्या आयुष्यातील खूप खास आहे. मी नशिबवान आहे की मला माझ्या मातृभूमीचा आदर करण्याची संधी मिळाली. एवढ्या मोठ्या संख्येने येऊन आशीर्वाद देण्यासाठी मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. "भाजप सरकारच्या गेल्या आठ वर्षात आपण कधीही स्वत:ला पंतप्रधान समजलं नाही तर देशाचा 'प्रधान सेवक' म्हणूनच विचार केला," असं त्यांनी पुढे म्हटलं.
गेल्या 8 वर्षांत कधीच स्वत:ला पंतप्रधान समजलं नाही: मोदी
"गेल्या 8 वर्षात... मी स्वतःला एकदाही पंतप्रधान म्हणून पाहिलेलं नाही. जेव्हा मी कागदपत्रांवर स्वाक्षरी करतो तेव्हा पंतप्रधानपदाची जबाबदारी माझ्यावर असते, पण एकदा फाईल निघून गेल्यावर असं वाटतं की मी आता पंतप्रधान नाही... मी फक्त 130 कोटी लोकांचा प्रधान सेवक आहे जे माझ्या आयुष्यातील सर्वस्व आहेत," असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.
2014 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात 'प्रधानसेवक' म्हणून उल्लेख
2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावर्षी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात त्यांनी पहिल्यांदा स्वतःला 'प्रधान सेवक' म्हटलं होतं. "माझ्या प्रिय देशवासियांनो! मी इथे 'पंतप्रधान' म्हणून नाही तर 'प्रधान सेवक' म्हणून आलो आहे. गरीब कुटुंबातील एक लहान मुलगा आज स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरु राष्ट्रध्वज फडकवत आहे, हे भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य आहे,"असं ते म्हणाले होते.