मुंबई : देशातल्या सव्वाशे कोटी भारतीयांना आधारकार्ड अनिवार्य करणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या कार्यालयाकडेच त्यांच्या मंत्र्यांच्या आधार कार्डची माहिती नाही. ही धक्कादायक बाब आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मिळालेल्या माहितीतून समोर आली आहे.

मंत्रिमंडळातील ज्या सदस्यांनी आपल्या आधारकार्डची माहिती सादर केली असेल, त्यांच्या नावांची यादी गलगली यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे मागितली होती. मात्र, पीएमओनं गलगलींचा अर्ज इतर ५ कार्यालयांना हस्तांतरित केला.

तर जनमाहिती अधिकारी अशोक कुमार यांनी सदर माहिती त्रयस्थ व्यक्तीशी संबंधित असल्याचा दावा करत केवळ निवासी ज्यांच्याशी माहिती संबंधित आहे तोच माहिती प्राप्त करु शकतो. त्यामुळे अनिल गलगली यांच्या मते स्वतः पंतप्रधान आणि मंत्र्यांच्या 'आधार' कार्डची माहिती केंद्रीय शासनाकडे उपलब्ध नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाकडे मंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत असल्याची बाब गलगली यांनी नमूद केली.