मुंबई : नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर नोटीस पिरीएड न पाळल्याबद्दल कापलेल्या रकमेवर कर लावता येणार नाही, असं इनकम टॅक्स संबंधी निर्णय घेणाऱ्या आयकर लवादाने (इन्कम टॅक्स अॅपलेट ट्रिब्युनल) स्पष्ट केलं आहे.


दोन कंपन्यांनी नोकरी सोडलेल्या दोघा कर्मचाऱ्यांची देयकं देताना नोटीस पिरीएड न पाळल्याबद्दल पगार कापला होता. मात्र कर मूल्यांकन करताना ही कपात ध्यानात घेतली नव्हती. प्रत्यक्षात फक्त पगाराची रक्कमच करपात्र असते, नोटीस पिरीएड न पाळल्याबद्दल कापलेली रक्कम नव्हे, असं आयकर लवादाच्या अहमदाबाद खंडपीठाने 18 एप्रिलला दिलेल्या निर्णयात स्पष्ट केलं.

सामान्यपणे नोटीस पिरीएड न देता राजीनामा दिल्यास कंपनी कर्मचाऱ्याच्या पगारातून काही रक्कम कापते. मात्र कर लावताना या कपात केलेल्या रकमेचा विचार न करता, सरसकट कर कापला जातो.

2009-10 मध्ये रिबेलो यांनी रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि सिस्टेमा श्याम टेलिसर्व्हिसेस या दोन कंपन्यांचा राजीनामा दिला होता. दोन्ही कंपन्यांनी अनुक्रमे 1.10 लाख आणि 1.66 लाख रुपये इतका नोटीस पे कापून उर्वरित रक्कम त्यांना दिली होती. त्यावर सुनावणी करताना आयकर लवादाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.