कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 1 ऑक्टोबरला दुर्गा मूर्तींच्या विसर्जनावर बंदी घातली आहे. ममतांच्या या निर्णयामुळे वाद होण्याची शक्यता आहे.


यंदा दुर्गा विसर्जन आणि मोहरम एकाच दिवशी म्हणजे 1 ऑक्टोबरला आहे. मोहरममुळे दुर्गा पुजेनंतर होणाऱ्या विसर्जनावर 30 सप्टेंबर संध्याकाळी 6 पासून 1 ऑक्टोबरपर्यंत बंदी राहिल. विसर्जन 2,3, 4 ऑक्टोबरला करता येईल, असं ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.
https://twitter.com/MamataOfficial/status/900394210116775936

https://twitter.com/MamataOfficial/status/900395774466334720
दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने समाजामध्ये वाद निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं ममता सरकारचं म्हणणं आहे.

"यंदा दुर्गा विसर्जन आणि मोहरम एकाच दिवशी आहे. सणांच्या काळात आपल्याला शांतता राखायला हवी. मी पोलिसांना पूजा आणि मोहरम समितींशी बातचीत करण्यास सांगेन. जिथून मोहरमचे जुलूस जातील तिथे बॅरिकेट्स लावले जातील. जेणेकरुन दोन्ही समुदायांच्या मिरवणुकींचा सामना होणार नाही. यासंदर्भात पूजा समित्यांना महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल. कोणतीही अप्रिय घटना घडू नये याची काळजी घ्यावी. आम्ही दंगली भडकावण्याची परवानगी देत नाही," असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

ममता बॅनर्जी यांच्या घोषणेनंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. या निर्णयाविरुद्ध कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

भाजपचे राष्ट्रीय महासचिव राहुल सिन्हा यांच्या मते, "ममता सरकार मनमानी करत आहे. त्यांनी हिंदू सणावर बंदी घातली आहे. केवळ अल्पसंख्यांकांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. सरकारने रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवरही बंदी घातली आहे. या या प्रकरणी कोर्टात जाणार आहोत."

विशेष म्हणजे गेल्यावर्षीही असाच प्रसंग उद्धभवला होता. त्यावेळी कोलकाता हायकोर्टाने ममता सरकारला धारेवर धरुन हा आदेश रद्द केला होता. राज्य सरकारचा निर्णय मनमानी करणारा आणि विशेष समुदायाला खुश करण्याचा प्रयत्न असल्याचं हायकोर्टाने सांगितलं होतं.