नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुन मोदी सरकारविरोधात टीडीपी आणि वायएसआर काँग्रेस हे दोन्ही पक्ष आक्रमक झाले आहेत. आज संसदेत मोदी सरकारविरोधात हे दोन्ही पक्ष अविश्वास ठराव मांडण्याची शक्यता आहे. काही पक्ष सोडल्यास, बहुतेक सगळ्याच विरोधी पक्षांनी या ठरावाला समर्थन घोषित केले आहे.

टीडीपी आणि टीडीपीचे कट्टर विरोधी असणाऱ्या वायएसआर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याची घोषणा केली आहे.

भाजपवरील विश्वास संपुष्टात आला आहे, त्यामुळे आम्ही अविश्वास ठराव आणत आहोत, असे टीडीपीचे खासदार रविंदर बाबू म्हणाले. तर वायएसआर काँग्रेसचे खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी म्हणाले, “संपूर्ण देशाला माहित पडावं की, आंध्र प्रदेशातील लोक कोणत्या अडचणींचा सामना करत आहेत. त्यामुळे आम्ही हा अविश्वास ठरावाचा प्रस्ताव आणत आहोत. सर्व विरोधी पक्षांशी आमची चर्चा झाली आहे. सर्वजण सोबत आहेत. ज्यावेळी आम्ही संसदेत अविश्वास ठरावाचा प्रस्ताव मांडू, त्यावेळी काँग्रेस, टीएमसी, सीपीएम, एसपी आमच्यासोबत असेल.”

मोदी सरकारविरोधातील या पहिल्या अविश्वास ठरावाच्या प्रस्तावाला डावे पक्ष आणि काँग्रेसनेही समर्थनाची घोषणा केली आहे.

कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी म्हणाले, “आम्ही अविश्वास प्रस्तावाचे समर्थन करु. मोदी सरकारने आंध्र प्रदेशच्या जनतेला फसवलं आहे. विशेष दर्जा देण्याचे आश्वासन मोदींनी पूर्ण केले नाही. हैदराबाद तेलंगणात गेल्याने आंध्रचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांची भरपाई मिळायला हवी. विशेष राज्याचा दर्जा मिळायला हवा.”

अविश्वास ठरावासाठी लागणाऱ्या 54 मतांची जुळवाजुळव करण्यात आली असल्याचे काँग्रेस नेते अश्विनी कुमार म्हणाले. शिवाय, मोदी सरकारवर पहिल्यापासूनच अविश्वास असल्याचे सांगायलाही अश्विनी कुमार विसरले नाहीत.

अविश्वास ठराव आणि संख्याबळ

सरकारमधून बाहेर पडलेल्या टीडीपीकडे एकूण 16 खासदार आहेत, तर वायएसआर काँग्रेसकडे 9 खासदार आहेत. 34 खासदार संख्या असलेल्या तृणमूल काँग्रेसनेही ठरावाला समर्थन दिले आहे. म्हणजे ठराव मांडण्यासाठी लागणाऱ्या 54 खासदारांची संख्या पूर्ण झाली आहे. काँग्रेसही सोबत आल्यास या ठरावाला आणखी बळ मिळेल. शिवसेनेनेही अविश्वास ठरावादरम्यान तटस्थ राहण्याची घोषणा केली आहे.