Nitish Kumar Reaction on Prashant Kishor : सध्या बिहरमधील राजकीय वातावरण चांगलेच गरम झाल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुक रणनितीकार प्रशांत किशोर यांची सध्या बिहारमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. लवकरच प्रशांत किशोर यांनी राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले आहे. दरम्यान, गुरुवारी प्रशांत किशोर यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यावर आरोप केले होते. त्यांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले नितीश कुमार
प्रशांत किशोर यांनी गुरुवारी पाटण्यात पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यावर आरोप करत, तीन दशकांनंतरही बिहार मागासलेले राज्य असल्याचे म्हणाले होते. हे राज्य सर्वात खालच्या स्तरावर आहे. त्यावर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हालाच माहित आहे की आम्ही काम केले आहे की नाही ते, कोण काय बोलतो याचा काही फरक पडत नाही. सत्य महत्त्वाचे असल्याचे नितीश कुमार यावेळी म्हणाले. काय झाले आणि किती काम झाले हे सर्वांना माहीत आहे. आम्ही कोणाच्या बोलण्याला महत्त्व देत नाही. प्रसारमाध्यमांकडे बोट दाखवत ते म्हणाले की, जर तुम्हाला सर्व माहिती असेल तर तुम्हीच सांगा आणि उत्तर द्या, असेही नितीशकुमार यावेळी म्हणाले.
प्रशांत किशोर काय म्हणाले होते?
प्रशांत किशोर यांनी गुरुवारी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, लालू-नितीश यांच्या 30 वर्षांच्या राजवटीत बिहार मागासलेला आहे. लालू-नितीश बिहारमध्ये बदल घडवून आणू शकले नाहीत. निती आयोगासह प्रत्येक अहवालात बिहार आज गरीब, प्रत्येक क्षेत्रात मागासलेला आहे. बिहारमध्ये बदल करावा लागेल. नव्या विचाराने पुढे जाण्याची गरज आहे. बिहार समजणारे लोकांनी बिहारची समस्या समजून घ्याव्यात. त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. जे बिहारचे प्रश्न सोडवू शकतात, त्यांच्यासोबत काम करणार असल्याचे प्रशांत किशोर म्हणाले होते.
मी पक्ष काढला तरी तो फक्त माझा पक्ष राहणार नाही, असेही प्रशांत किशोर म्हणाले. जे लोक माझ्यासोबत येतील त्यांचाही पक्ष असेल. एक वीट माझी आणि एक वीट त्यांची असेल. येत्या 2 ऑक्टोबरपासून मी चंपारण येथील गांधी आश्रमातून पदयात्रा सुरु करणार आहे. मी एकूण तीन हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. वर्षभर बिहारमध्ये फिरुन जनतेच्या आशा, आकांक्षा, समस्या समजून घेणार आहे. बिहारला पुढच्या 10 वर्षांत विकसित राज्यांच्या श्रेणीत आणणार असल्याचे प्रशांत किशोर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: