Nitishkumar : बिहारमध्ये राजकीय (Bihar Politics) उलथापालथींना वेग आला असून जदयू-राजद महाआघाडीचे सरकार आता पायउतार होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. नितीशकुमार (Nitishkumar) यांच्या नेतृत्वातील जनता दल यूनायटेड (Janta Dal United) हा भाजपसोबत सत्ता स्थापन करणार आहे. नितीशकुमार हे रविवारी, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळीच नितीशकुमार हे आपला राजीनामा सोपवणार असल्याचे वृत्त आहे.


'टाईम्स नाऊ' या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, जदयू आणि भाजप दरम्यान सरकार स्थापनेबाबतची चर्चा पूर्ण झाली आहे. नितीशकुमार आज संध्याकाळी राज्यपालांना भेटून आपला राजीनामा सोपवणार आहेत आणि उद्या, रविवारी भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणार आहेत. एकाच पंचवार्षिकमध्ये नितीशकुमार हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. 


भाजपकडून दोन उपमुख्यमंत्री


नितीशकुमार यांच्यासोबत सत्ता स्थापन होत असताना नव्या मंत्रिमंडळात भाजपचे दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. सुशीलकुमार मोदी आणि रेणू देवी हे दोघेजण उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास भाजपची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नितीशकुमार यांना पाठिंबा देण्याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकते. 


नितीशकुमारांच्या पक्षाची पुनर्रचना 


नितीशकुमार यांनी एनडीएसोबत जाण्यातील सर्व अडथळे दूर केले आहेत. जेडीयूची पुनर्रचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते नवी कार्यकारिणी तयार झाली आहे. विशेष म्हणजे राजीव रंजन उर्फ ​​लालन सिंह यांची राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हकालपट्टी केल्यानंतर आता त्यांची गठित कार्यकारिणी बरखास्त करून नवी समिती स्थापन करण्यात आली आहे. वशिष्ठ नारायण सिंह यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.  


लालू यादवही सक्रीय


राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव हे देखील सक्रीय झाले आहेत. लालू प्रसाद यादव यांनी आपल्या आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीत आमदारांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर, ही बैठक लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी असल्याचा दावा राजदच्या एका आमदाराने केला. राजद खासदार मनोजकुमार झा यांनी राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाल्याचे म्हटले. ही बैठक सकारात्मक झाली असून लालू प्रसाद यादव यांना आगामी काळातील निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले असल्याचे झा यांनी सांगितले. 






>> बिहारमधील संख्याबळ


> राष्ट्रीय जनता दल - 79


> भाजप - 78
> जेडीयू - 45
> काँग्रेस - 19
> CPI(ML)L - 12
> हम - 4
> CPI -2 
> CPIM - 2
> अपक्ष,इतर - 1
> MIM - 1
-------------
एकूण - 243