पाटणा : मी कुणाला राजीनामा मागितला नाही. लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना त्यांच्यावर लावण्यात येत असलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली होती. मात्र असं काहीही झालं नाही. अशी परिस्थिती झाली की मी त्यामध्ये कामच करु शकत नव्हतो. त्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर दिली.

लालू प्रसाद यादव यांच्यावर होत असलेल्या सीबीआयच्या छापेमारीनंतर आणि अघोषित संपत्तीच्या कारवाईनंतर नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला.

बिहारमध्ये महायुतीचं सरकार आहे. ज्यामध्ये काँग्रेसही मित्र पक्ष आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशीही चर्चा केली. मात्र काहीही तोडगा निघाला नाही, अशी माहिती नितीश कुमार यांनी दिली.

भाजपसोबत जाणार का? नितीश कुमार यांचं उत्तर

राजीनामा दिल्यानंतर आता भाजपसोबत सरकार स्थापन करणार का, असा प्रश्नही नितीश कुमार यांना विचारण्यात आला. मात्र त्यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली. पुढे काय होईल ते पाहा. बिहारच्या हितासाठी योग्य पाऊल नक्की उचलू. राजीनाम्याची माहिती काँग्रेस, लालू प्रसाद यादव आणि सर्व विधीमंडळ सदस्यांनाही देण्यात आली असल्याचं नितीश कुमार म्हणाले.

राजीनाम्यानंतर नितीश कुमार काय म्हणाले?

  • ''बिहारमध्ये 20 महिन्यांपेक्षा जास्त दिवस महायुतीचं सरकार होतं. त्या काळात अनेक कल्याणकारी योजना आणल्या. बिहारच्य जनतेच्या हिताचे दारुबंदीसारखे अनेक निर्णय घेतले.''

  • ''आम्ही नोटाबंदीचं समर्थन केलं तरीही माझ्यावर आरोप करण्यात आले. काळ्या पैशांविरोधात कडक कारवाई करण्याची भूमिका आम्ही घेतली, जी यापुढेही कायम राहिल.''

  • ''विरोधकांच्या एकजुटतेवर आम्ही नेहमीच ठाम आहोत. मात्र त्यासाठी काही ठराविक अजेंडा असण्याची गरज आहे. नोटाबंदी असो किंवा राष्ट्रपती निवडणूक. बिहारचे राज्यपाल असणाऱ्या रामनाथ कोविंद यांना पाठिंब दिला, तरीही आरोप करण्यात आले. बिहारमध्ये अशी परिस्थिती झाली, की ज्यामध्ये काम करणंच अशक्य होऊन बसलं. आम्ही वादाचं राजकारण करत नाही, त्यामुळे कुणाला राजीनामा मागितला नाही.''


काय आहे नेमकं प्रकरण?

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या मालमत्तांवर सीबीआयने छापेमारी केली होती.

या छापेमारीत तेजस्वी यादव यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे तेजस्वी यादव यांनी राजीनामा देण्याची मागणी जोर धरत होती.

दुसरीकडे  लालू प्रसाद यादव यांनी राजदच्या आमदारांची बैठक घेऊन, तेजस्वी यादव पदाचा राजीनामा देणार नाहीत, असं जाहीर केलं. तर तेजस्वी यादव यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना बडतर्फ करण्याचा इशारा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिला होता.

बिहारमध्ये जेडीयू, आरजेडी आणि काँग्रेसची युती आहे. या छापेमारीनंतर  गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांचं बोलणंही बंद झालं आहे. त्याचा भाग म्हणून बिहारमध्ये झालेल्या एका सरकारी कार्यक्रमाला नितीश कुमारांची हजेरी होती, पण उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दांडी मारली होती.

बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबल (एकूण 243 सदस्य) : 

  • आरजेडी (लालू) – 80

  • जेडीयू (नितीश कुमार) – 71

  • काँग्रेस – 27

  • भाजप – 53

  • सीपीआय – 3

  • लोक जनशक्ती पार्टी – 2

  • राष्ट्रीय लोक समता पार्टी – 2

  • हिंदुस्तानी अवाम मोर्चा – 1

  • अपक्ष – 4