अहमदाबाद : गुजरातमधील नितीन पटेल यांच्या नाराजीनाट्यावर अखेर पडदा पडला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांच्या एका फोननंतर नितीन पटेल यांनी आज मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला. खातेवाटपात महत्त्वाची खाती न मिळाल्याने, नितीन पटेल यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती.

गेल्या सरकारमध्ये नितीन पटेल यांच्याकडे अर्थ आणि नगरविकास ही महत्त्वाची खाती होती. पण या वेळी त्यांना रस्ते, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण अशी खाती देण्यात आली. अर्थ खाते सौरभ पटेल यांच्याकडे, तर नगरविकास मंत्रालय मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी स्वत: कडे ठेवलं होतं. त्यामुळे नितीन पटेल यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती.

यानंतर पटेल समाजाने आक्रामक पवित्रा घेत, हा खातेवाटपाचा मुद्दा नाही, तर आत्मसन्मानाचा विषय असल्याचा इशारा भाजपला दिला होता. तर नितीन पटेल यांच्या मेहसाणा मतदारसंघातील पटेल समर्थकांनी 1 जानेवारीपासून मेहसाणा बंदचा इशारा दिला होता. दुसरीकडे सरदार पटेल समूह संयोजक लालजी पटेल यांनी शनिवारी नितीन पटेल यांना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी केली होती.

विशेष म्हणजे, नितीन पटेलांनी आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर, पाटीदार नेता हार्दिक पटेलसह प्रदेश काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांना भाजपला रामराम करुन काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं आमंत्रण दिलं होतं. नितीन पटेलांनी भाजप सोडून पाठिंबा देणाऱ्या समर्थक आमदारांसह काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करावे, अशी सूचना काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार विरजी थुम्मर यांनी केली होती.

पण नितीन पटेलांनी याला स्पष्ट नकार देत, अमित शाहांच्या फोननंतर आज मंत्रीपदाची पदभार स्वीकारला.

पदभार स्वीकारल्यानंतर नितीन पटेल यांनी सांगितलं की, “आज सकाळी साडे सात वाजता अमित शाहांचा फोन आला. यावेळी त्यांच्यासोबत पदभार स्विकारण्यावरुन चर्चा झाली. त्यांनी आपल्याला पद स्वीकारण्याचं आवाहन केलं. त्यांनी आपल्याला हावी असलेली खाती देण्याचं आश्वासन दिल्यानंतर, आज सकाळी आपण मंत्रीपदाचा पदभार स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.”