Nipah Virus VS Covid-19 : कोरोना व्हायरस (Covid-19) अजून जगातून पूर्णपणे गेलेला नसतानाच निपाह व्हायरसने (Nipah Virus) आता जगभरात खळबळ उडवली आहे. केरळमध्ये या विषाणूने डोके वर काढले आहे. केरळमध्ये (Kerala) अनेक लोक या आजाराचे शिकार झाले आहेत. केरळमध्ये या विषाणूमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जणांना याची लागण झाली आहे. या सगळ्यामध्ये इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) डीजी राजीव बहल यांनी भीतीदायक आकडेवारी मांडली आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, त्यांनी सांगितले की, निपाह व्हायरसमध्ये मृत्यूचे प्रमाण 40-70 टक्क्यांच्या दरम्यान आहे. याशिवाय, हे रोखण्यासाठी केंद्र सरकारने ऑस्ट्रेलियाकडून मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे 20 डोस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ICMR प्रमुख म्हणाले, 2018 मध्ये, आम्ही ऑस्ट्रेलियातून मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे काही डोस घेतले होते. सध्या हे डोस फक्त 10 रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. आणखी 20 डोस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण हे औषध संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात द्यावे लागते.”
निपाह व्हायरस कोरोना पेक्षा जास्त धोकादायक
याशिवाय, ते म्हणाले की या विषाणूची लागण झालेल्या 100 लोकांपैकी 40-70 लोकांना मृत्यूचा धोका आहे. राजीव बहल म्हणाले की, कोरोना संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण केवळ 2-3 टक्के होते. त्या तुलनेत निपाह बाधित लोकांच्या मृत्यूचे प्रमाण 40 ते 70 टक्के आहे जे फारच जास्त आहे. सध्या या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी काही उपाययोजना केल्या जात आहेत.
'निपाह माणसांपासून माणसात पसरतो'
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगिते की, निपाह हा विषाणूचा बांगलादेशी प्रकार आहे आणि तो माणसापासून माणसात पसरतो. केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यांनी पुढे असेही सांगितले की, निपाह हा विषाणू कमी संसर्गजन्य आहे परंतु त्याचा मृत्यू दर जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, 'हा आजार प्राणी आणि पक्ष्यांमुळे पसरणारा आजार आहे. तर कोरोना आणि निपाह या दोन आजारांची तुलना केली तर कोरोनापेक्षा निपाह व्हायरस जास्त भयानक आहे. याचे महत्वाचे कारण असे की, यावर कोणताही इलाज नाही तसेच उपचारासाठी आजपर्यंत कोणतीही लस तयार करण्यात आलेली नाही. त्यामुळे याला प्रतिबंध करणे हाच एकमेव उपाय आहे.'
महत्त्वाच्या बातम्या :