भरधाव मर्सिडीजनं तरुणाला उडवलं, अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत कैद
एबीपी माझा वेब टीम | 07 Apr 2016 02:43 AM (IST)
नवी दिल्ली: रस्ता ओलांडणाऱ्या युवकाला भरधाव मर्सिडीज कारनं उडवल्यानं त्याचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतल्या उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या सिव्हिल लाईन्स परिसरात ही घटना घडली. सिद्धार्थ शर्मा असं मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे. तो मार्केटिंग विभागात कार्यरत होता. कार एवढ्या वेगात होती की, त्या धडकेनेच सिद्धार्थ बराच लांब फेकला गेला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं. याप्रकरणी मर्सिडीज कार चालवत असलेल्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली असून त्याची जामीनावर सुटकाही झाली आहे. आरोपी मुलगा हा बारावीतील विद्यार्थी आहे. आपल्या मित्रांसोबत त्याचं सेलिब्रेशन सुरू होतं. कारमध्ये 8 लोक होते अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनं दिली. या घटनेनंतर कारची डिव्हाडरला टक्कर झाली, त्यानंतर गाडीचे दोन टायर फुटल्यानं कारमधल्या मुलांनी घटनास्थळावरून पळ काढला. ही कार मनोज अग्रवाल नावाच्या व्यक्तीची असल्याचं कळतं आहे.