बिजनौर (उत्तर प्रदेश) : पठाणकोट हल्ल्याच्या तपास करणाऱ्या एनआयएच्या अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातल्या बिजनौरमध्ये हा प्रकार घडला असून तांझील अहमद असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तांझील आपल्या पुतणीच्या लग्नावरुन परिवारासोहत परतत होते. यावेळी मोटारसायकलवरुन पाठीमागून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने तांझील यांच्यावर आपल्या '9 एम एम' पिस्तुलीच्या सहाय्याने 21 गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात तांझील अहमद यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार पत्नीला एक गोळी लागली आहे.

 

तांझील यांच्या नातेवाईकांनी या हल्ल्यामागे अतिरेकी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील तपासासाठी एनआयएचं पाच सदस्यांचं पथक मोरारबादला दाखल झालं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास एनआय़ए करणार असल्याचं समजतं आहे.

 

कोण होते तांझील?

तंजील अहमद हे एनआयएच्या ऑपरेशन कोअर टीममधील एक महत्त्वाचे सदस्य होते. मोठमोठ्या दहशतवादी हल्ल्यांच्या चौकशी पथकातही त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली असून काही महिन्यांपूर्वी झालेल्या पठानकोट हल्ल्याच्या चौकशी पथकातही ते सहभागी होते. पाकिस्तानहून जेव्हा जेआयटी आली होती, तेव्हा त्यांच्या टीमसोबत ते पाच दिवस होते.