नवी दिल्ली: राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणेने (एनआयए) आज जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. दहशतवाद्यांना फंडिंग केल्याप्रकरणात एनआयएनं चौकशी सुरु केली असून जम्मू काश्मीरमधील अनेक जिल्ह्यांमध्ये धाडसत्र सुरु आहे. या चौकशी संदर्भात एनआयएच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, एनआयए सीआरपीएफ सोबत मिळून जम्मू काश्मीरमधील काही जिल्ह्यांमध्ये चौकशी करत आहे. अद्याप चौकशीत काय समोर आलंय याबाबत मात्र कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही.
एजंसीच्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की, दहशतवादी विरोधी चौकशी यंत्रणा दहशतवादी संघटना जमात -ए-इस्लामी च्या ज्येष्ठ सदस्यांशी संबंधित चौकशी करत आहे. या चौकशीच्या निमित्ताने जवळपास 40 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसात एनआयएनं वेगवेगळ्या प्रकरणात छापे टाकत चौकशी केली आहे आणि काही लोकांना अटक देखील केली आहे.