विमान प्रवाशांसाठी नव्या नियमावलीची घोषणा, जूनपासून अंमलबजावणी
एबीपी माझा वेब टीम | 05 May 2017 05:16 PM (IST)
फाईल फोटो
नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वी शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्या एअर इंडिया कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणानंतर, केंद्र सरकारने विमान प्रवाशांसाठी नवीन नियमावली तयार करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, केंद्रीय विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी आज नव्या नियमावलीची घोषणा केली. या नियमावलीवर जनतेकडून ऑनलाईन प्रक्रियेद्वारे हरकती आणि सूचना मागणव्यात आल्या आहेत. त्यानंतर त्यात आवश्यक ते बदल करुन जून महिन्यापासून त्याची सर्वत्र अंमलबजावणी होईल. या नव्या नियमावलीत 'नो फ्लाय लिस्ट'चा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार जर एखाद्या विमान प्रवाशाने विमान उड्डाणावेळी किंवा विमानतळावर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, तर तो कायदेशीर गुन्हा मानला जाणार आहे. यासाठी संबंधित प्रवाशाला तीन महिन्यापासून ते दहा वर्षांपेक्षा अधिक काळ विमान प्रवासावर बंदी घातली जाऊ शकते. तसेच विमान अशा गोंधळी प्रवाशांचे तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या प्रकारा विमानात हातवारे करुन गोंधळ घालणे, दुसरा शारिरीक इजा करुन अपमानजनक गैरव्यवहार करणे, आणि तिसऱ्या प्रकारात कुणालाही जीवे मारण्याची धमकी देणे, आदींचा समावेश आहे. 23 मार्च रोजी शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चप्पलने मारहाण केल्याचा आरोप झाला होता. या घटनेनंतर एअर इंडियाच्या वतीने विमान प्रवाशांसाठी नवी नियमावली लागू करण्याची मागणी केली होती. एअर इंडियाची या मागणीची दखल घेऊन केंद्र सरकारने नवे नियम तयार केले आहेत. रवींद्र गायकवाड प्रकरणानंतर एअर इंडियानंही त्यांच्यावर विमान प्रवासासाठी बंदी घातली होती. मात्र त्यांनी माफीनामा सादर केल्यानंतर त्यांच्यावरील ही बंदी मागे घेण्यात आली.