नवी दिल्ली : आजपासून एखाद्या दाम्पत्याला मुल दत्तक घेताना कोणताही पर्याय देण्यात येणार नाही. कारण केंद्र सरकारच्या राष्ट्रीय संस्थेतर्फे इच्छुक दाम्पत्याला जे मुल दिलं जाईल तेच दत्तक म्हणून घ्यावं लागेल. ते मुल स्विकारायचं की नाही एवढाच पर्याय दाम्पत्यासमोर असेल.

मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना सरकारच्या दत्तक विषयक पोर्टवर नोंदणी करावी लागते. अशा इच्छुक पालकांना आत्तापर्यंत मुल दत्तक देण्यासाठी तीन मुलांचा पर्याय दिला जायचा आणि त्यापैकी एक मूल त्यांना निवडता येत असे. हिच प्रथा आजपासून बंद होत असून पालकांना प्रत्येकी एकच मूल देऊ केलं जाणार आहे.

एखाद्या दाम्पत्यास जेव्हा पुत्रप्राप्ती होते, तेव्हा त्यांना मूल असेच व्हावे, असा पर्याय नसतो. नशिबाने पोटी जन्माला येणारे मूल कसेही असले, तरी आई-वडिलांसाठी ते नापसंत कधीच नसते. त्यामुळे दत्तक घेतलेल्या मुलाचाही याच भावनेने स्वीकार करुन सांभाळ व्हावा, हा या नियमाचा उद्देशही योग्यच आहे.

या नव्या नियमानुसार, एखाद्या मुलाची माहिती पाठविल्यापासून ते मूल हवे की नको याचा निर्णय इच्छुक पालकांना 48 तासांच्या आत घ्यायचा आहे. त्यांनी ते मूल घ्यायचे ठरविले तर पुढील औपचारिकता पूर्ण करुन त्यानंतर औपचारिक दत्तक आदेश घेण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला जाईल.