नवी दिल्ली: आता परदेशात वसलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडून मदत हवी असल्यास ती सहज उपलब्ध होणार आहे. कारण परराष्ट्र मंत्रालयाने आजपासून फेसबुक अॅप सुरु केले आहे. या अॅपमुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात संकटात सापडलेल्या भारतीयांना तत्काळ मदत मिळणार आहे.

 

परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, ''मंत्रालयाच्या फेसबुक पेजवरच्या वरच्या भागात हे अॅप असेल. जर तुम्ही कोणत्याही देशात संकटात सापडले असाल, तर अशावेळी या अॅपला क्लिक केल्यास तुमच्यासमोर जगाचा नकाशा येईल. या नकाशावर प्रत्येक देशातील दूतावास रेखांकित केले असतील. याशिवाय यामध्ये उच्चायोग, काऊन्सलेट, कार्यालय आदींची सर्व माहिती असेल. यातील माहितीचा वापर करून त्यांच्याशी संपर्क साधल्यास त्या व्यक्तीच्या समस्येचे तत्काळ निवारण करता येईल.''

 

वास्तविक, सुषमा स्वराज यांनी जेव्हापासून परराष्ट्र खात्याची सूत्रे सांभाळली आहेत, तेव्हापासून त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून परदेशातील भारतीयांच्या सतत संपर्कात आहेत. त्यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून त्यांना कोणत्याही भारतीयाने मदत मागितली तर त्यावर तत्काळ कार्यवाही होती.

 

मात्र, यामध्ये काही व्यक्ती परराष्ट्र मंत्र्याकडे अनावश्यक मागण्या करत असल्याने त्यामध्ये गुंतणे स्वराज यांना शक्य नसते. त्यामुळे ही कामे उच्चायोग किंवा राजदूतांमार्फत करणे शक्य असते, तेव्हा त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

 

हे अॅप सुरु होण्याने सुषमा स्वराज यांच्यावरील भार कमी होईल, अशी आशा स्वरूप यांनी व्यक्त केली.