New Delhi : नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पर्यटकांच्या बसला नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यात अपघात झाला आहे. नेपाळमधील काठमांडुमध्ये निघालेल्या बसमध्ये एकूण 40 ते 41 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्व प्रवासी महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 14 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 16 ते 17 प्रवासी गंभीर जखमी असल्याचं समोर आलं आहे.
नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील अबुखैरेनी परिसरात महाराष्ट्रातील एक प्रवासी बस मर्स्यांगडी नदीत कोसळून अपघात झाला. नेपाळ पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. जिल्हा पोलीस कार्यालय तनहुचे डीएसपी दीपकुमार राय यांनी माहिती दिली की, यूपी एफटी 7623 क्रमांकाची बस नदीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. या बसमध्ये तब्बल 40 ते 41 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे.
नेपाळमधील अपघाताबाबत मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मला तासाभरापूर्वी ही घटना समजली आहे. मी संबंधित गावाचे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. उत्तर प्रदेशच्या नेत्यांसोबतही यासंदर्भात चर्चा केली. नेपाळमधील काठमांडूला सर्व भाविक जात असताना बसला अपघात झाल्याची माहिती मिळात आहे. 41 भाविक बसमध्ये होते. त्यातील 14 जण ठार झाले आहेत. नेपाळच्या लष्कराकडून मदतकार्य सुरू आहे. तसेच, दुर्घटनेतून जखमींवर उपचार करण्यासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अद्याप फारशी माहिती मिळालेली नाही. त्यामुळे आताच सर्व गोष्टी जाहीर करणं शक्य नाही. पण आम्ही तिथल्या सर्व यंत्रणांसोबत आम्ही संपर्कात आहोत.
नेपाल दुर्घटना संदर्भात मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी माहिती देताना म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील एक बस नेपाळमध्ये एका नदीत कोसळली असून त्यातील सोळा मृतदेह आढळले आहे. हे मृतदेह उत्तर प्रदेश रीलिप कमिश्नर यांनी स्वीकारून ते ज्या-ज्या जिल्ह्यातील असतील त्या-त्या जिह्यात शासनाच्या वतीनं ते पाठविण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली आहे. एका तासापूर्वी ही माहिती मिळाली आहे. त्यात बसमध्ये चाळीस लोक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तूर्तास एवढीच माहिती उपलब्ध झाली असून जळगाव जिल्ह्यातील अधिक प्रवासी या दुर्घटनेत असल्याची माहिती मिळाली आहे.
अपघातात 14 जणांचा मृत्यू
अपघातानंतर मदत आणि बचाव कार्यात 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 16 जखमी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. तसेच, त्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोखरा येथील माझेरी रिसॉर्टमध्ये थांबलेल्या महाराष्ट्रातील भाविकांनी घेऊन ही बस काठमांडुकडे रवाना झाली होती. अपघाताच्या वेळी बसमध्ये असलेले सर्व प्रवासी महाराष्ट्रातील असल्याची माहिती मिळत आहे.
जखमी स्थानिक रुग्णालयात दाखल
स्थानिक पोलीस आणि बचाव पथक तातडीनं घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी मदतकार्य सुरू केलं आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक वृत्तानुसार, बस नदीत नेमकी कशी कोसळली याचा शोध सुरू आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनानं आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. बचावकार्य आणि मदतकार्याला प्राधान्य दिलं आहे.
नेपाळमध्ये घडलेल्या दुःखद घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये चिंतेची लाट पसरली आहे. प्रशासन आणि बचाव पथक या दुर्घटनेच्या सर्व परिस्थितीचा सखोल तपास करत असून पीडित कुटुंबांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे.