मुंबई : मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात अपयश येण्यासाठी अप्रत्यक्षपणे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु कारणीभूत असल्याचं ट्विट भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आलं आहे. चीनने चौथ्यांदा विरोधात मतदान केल्याने संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीने मसूज अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. भाजपने याचं खापर पंडित नेहरुंवर फोडलं आहे.


जैश ए मोहम्मद या संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावं आणि जैशचा म्होरक्या मसूद अजहर यालाही आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावं, यासाठी अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सनं संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाविरोधात चीनने मतदान केल्याने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीने प्रस्ताव नाकारला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावर ट्विट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी चीनच्या अध्यक्षांना घाबरतात असं ट्विट त्यांनी केलं आहे.





या ट्विटला प्रत्युत्तर देताना भाजपकडून थेट नेहरुंना यासाठी दोषी धरण्यात आलं आहे. "तुमचे पणजोबा म्हणजेच भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यामुळेच चीनला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत स्थान मिळालं", असं ट्विट भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आलं आहे. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात येणाऱ्या अपयशाला अप्रत्यक्षपणे नेहरुच जबाबदार असल्याची टीका भाजपकडून करण्यात येत आहे.


संबंधित बातम्या :

मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी नाही, चीनच्या आडकाठीमुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीने प्रस्ताव फेटाळला