बिहार : मुजफ्फरपूरच्या खासगी रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रियेदरम्यान हलगर्जीपणा समोर आलाय. शस्त्रक्रियेनंतर 25 जणांच्या डोळ्यांना संसर्ग झालाय. यापैकी चौघांना डोळे गमवावे लागले आहेत. तर इतर काही लोकांनाही डोळे काढण्याचे निर्देश डॉक्टरांनी दिले आहेत. 22 नोव्हेंबरला उत्तर बिहारमधील डोळ्याच्या प्रसिद्ध रुग्णालयात 25हून अधिक जणांच्या डोळ्यांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आलं. या शस्त्रक्रियेनंतर या 25 जणांना त्रास होऊ लागला. या प्रकरणी पीडित नागरिकांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलीय. मात्र चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे 25 जण नाहक त्रासाला बळी पडले आहेत.


येथे पाहा बातमी :


बिहारच्या मुज्जफरपूरमधील रुग्णालयाचा हलगर्जीपणा



रुग्णांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मोतिबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना त्रास जाणवू लागला. डॉक्टरांना यासंबंधित माहिती मिळताच खळबळ माजली. रुग्णांच्या कुटुंबियांना सांगण्यात आलं की, ''दुसरा डोळा वाचवण्यासाठी रुग्णाचा बाधित डोळा काढून टाकावा लागेल.'' पीडित रुग्णांच्या कुटुंबियांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार केल्यानंतर आता एक चौकशी समिती नेमून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. त्याचबरोबर या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना एसकेएमसीएच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.


शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात मुझफ्फरपूर आणि आसपासच्या परिसरातून रुग्ण आले होते. यापैंकी सावित्री देवी, मीना देवी, कौशल्या देवी आणि हरेंद्र रजक यांचा एक डोळा काढण्यात आला आहे. रुग्णालयाचे सहाय्यक व्यवस्थापक दिपक कुमार यांनी सांगितलं की, या सर्व रुग्णांवर याचं रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामधील चार रुग्णांच्या डोळ्यांना संसर्ग झाल्यानं त्यांचे डोळे काढण्यात आले. 


दरम्यान, अनेक पीडित रुग्ण रुग्णालयात येऊ लागल्यानं हे प्रकरण वाढतं असल्याचं लक्षात येताच रुग्णालय बंद करून रुग्णालयातील कर्मचारीही गायब झाले. या घटनेसंदर्भात सिव्हिल सर्जन विनयकुमार शर्मा यांनी सांगितलं की, ''हे प्रकरण गंभीर आहे. आरोग्य विभागाकडून विशेष पथक तयार करण्यात आलंय. प्रकरणाचा योग्य तपास करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल'' 


 


महत्त्वाच्या बातम्या :