नवी दिल्ली : सीबीएसईने 'नीट' 2018 परीक्षेचं अॅडमिट कार्ड जारी केल्यानंतर आता विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या दिवशी ड्रेसकोडसह  भली मोठी आणि कडक नियमावली जारी केली आहे. परीक्षार्थींनी हाफ स्लीव्हचा फिकट रंगाचा शर्ट घालावा. इतकंच नाही तर परीक्षेला घड्याळ, बेल्ट शूज नको अशी अटी घालण्यात आली आहे.


मागील वर्षी नीट परीक्षेसाठी ड्रेसकोड निर्धारित केला होता, ज्यामुळे सीबीएसईला अनेक प्रकारच्या वादांचा सामना करावा लागला होता. या वादापासून वाचण्यासाठी यंदा सीबीएसईने महिला आणि पुरुष विद्यार्थ्यांसाठी ड्रेसकोड जारी केला आहे.

परीक्षेच्या दिवशी परीक्षार्थींसाठी ड्रेसकोड
- परीक्षेच्या दिवशी हाफ स्लीव्हचे फिकट रंगाचे कपडे घालून या
- कपड्यांवर कोणत्याही प्रकारची बटणं लावलेली नसावीत. शिवाय मुलींनी अॅम्ब्रोयडरी असलेले ड्रेसही परिधान करुन नये
- परीक्षेच्या दिवशी शूज घालून येऊ नका. स्लिपर्स किंवा कमी उंचीच्या सँडल्स चालतील.
- बुरखा, पगडी परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्याच्या एक तास आधी परीक्षा केंद्रांवर पोहोचायला हवं.
- विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची स्टेशनरी किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस घेऊन येऊ नये. इतकंच नाही तर विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिलसोबतही एक्झाम हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
- परीक्षा केंद्रावर दागिने, हॅण्डबॅग, पाण्याची बाटलीही घेऊन येऊ नये

परीक्षेला अॅडमिट कार्ड आवश्यक आहे. त्याशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. सीबीएसईने मंगळवारी नीटचं अॅडमिट कार्ड जारी केलं आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत अॅडमिट कार्ड डाऊनलोड केलं नाही तर सीबीएसई नीटच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ते डाऊनलोड करु शकता.

देशभरामध्ये येत्या 6 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत नीटची परीक्षा होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षेच्या तारखेत आणि वेळेत बदल होणार नाही, असं सीबीएसईने स्पष्ट केलं आहे. परीक्षेचा निकाल 5 जून रोजी जाहीर होईल. त्या पार्श्वभूमीवर सीबीएसईने नियमावली प्रसिद्ध केली आहे.

त्यामुळे परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी सीबीएसईने जारी केलेलं नोटिफिकेशन पूर्ण वाचा.