मुंबई/वसई : नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी देश सज्ज झाला आहे. नाताळमुळे देशभरात सर्व ख्रिस्ती बांधवांसह सर्वांमध्येच उत्साहाचे वातावरण आहे. सर्व चर्चमध्ये सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आज आयोजन करण्यात आले आहे.
काल रात्रीपासून संपूर्ण जगभरात नाताळ म्हणजेच ख्रिसमस सेलिब्रेट करायला सुरवात झाली. आपली मुंबईदेखील त्यात कशी काय मागे असेल? काल रात्री मुंबईच्या विविध चर्चमध्ये मिडनाईट मासचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधव या प्रेयरसाठी चर्च मध्ये आले होते. मुंबईतील अफगाण चर्च, माहीम येथील सेंट मायकल चर्च, आणि वांद्रे येथील माउंट मेरी या चर्चमध्ये रात्री गर्दी दिसून आली.
माहीमचे सेंट मायकल चर्च आकर्षक रोषणाईने सजवण्यात आले होते. येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबरला झाला अशी ख्रिस्ती बांधवांमध्ये मान्यता असल्याने 25 तारखेला नाताळ सण साजरा केला जातो. घरी केक, चॉकलेट बनवून एकमेकांना गिफ्ट्स देऊन आणि शुभेच्छा देऊन हा सण साजरा केला जातो.
वसईत बहुसंख्य ख्रिस्ती बांधव राहतात. त्यामुळे वसईतही सध्या नाताळाची धूम पाहायाला मिळत आहे. नाताळाच्या आदल्या रात्री प्रभू येशूच्या आगमनाची प्रार्थना करण्यात आली. पहिला प्रार्थना(मिसा)10 वाजता झाली तर दुसरी प्रार्थना 6.30 वाजता झाली.
नाताळाची खरी मजा वसईत पाहायाला मिळते. कारण वसई आणि नाताळ याचं अनोख नातं आहे. वसईतील सर्व चर्चवर रोषणाई करण्यात आली आहे. काल रात्री वसईतील सर्व ख्रिस्ती बांधव प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जमले होते. अत्यंत धार्मिक पध्दतीने मिसा झाली. चर्चमध्ये प्रभू येशूच्या आगमनाचे गीतही गायले गेले.