नवी दिल्ली : एनडीएतील घटकपक्षांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली जाईल, याबाबत एनडीएतील घटकपक्षांचं एकमत झालं आहे.
दिल्लीत मोदींच्या अध्यक्षतेखाली एनडीएच्या घटकपक्षांची बैठक पार पडली. त्यामध्ये हा निर्णय झाला. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह 32 घटकपक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीनंतर मोदींनी सर्व नेत्यांना स्नेहभोजनासाठी निमंत्रित केलं आहे.
2019 ची लोकसभा निवडणूक लढण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतरची एनडीएची ही दुसरी बैठक आहे.
आर्थिक सुधारणांवर चर्चा
एनडीएचं लोकसभा निवडणुकीनंतरचं इतर राज्यातील यश पाहता ही सरकारच्या यशस्वी धोरणांची जनतेने दिलेली पावती आहे. सरकारकडून सध्या आर्थिक सुधारणेसाठी काय प्रयत्न केले जात आहेत, त्यावरही एनडीएच्या बैठकीत चर्चा झाली, असं अरुण जेटलींनी सांगितलं.