नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये संपूर्ण काळ देशाची सेवा केली. आता जी काही कसर राहिली आहे, ती आम्ही या खेपेस भरुन काढू. या काळात सगळे दिवस आम्ही मोदींसोबत राहू, असा ठाम निर्धार संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी बोलून दाखवला. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची NDA ने नेतेपदी  निवड झाल्यानंतर एनडीएच्या घटकपक्षांची आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक झाली. यावेळी एनडीएतील घटकपक्षांच्या प्रमुखांनी मोदींच्या निवडीला अनुमोदन देताना अभिनंदनपर भाषणे केली. या सगळ्या भाषणांमध्ये बिहारमधील संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांचे भाषण लक्षवेधी ठरले. वारंवार राजकीय कोलांटीउड्या मारल्यामुळे बिहारच्या राजकारणात 'पलटुराम' अशी ओळख असलेल्या नितीश कुमार यांनी आपल्या खास बिहारी लहेजात केलेल्या भाषणात आपण या सरकारच्या संपूर्ण कार्यकाळात सोबत राहू, असे आश्वासन दिले. 


आमचा पक्ष एनडीएचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांच्या निवडीला समर्थन देत आहे. मोदी पंतप्रधान आहेत आणि पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. गेल्या 10 वर्षात मोदींनी संपूर्ण काळ देशाची सेवा केली. आता नव्या कार्यकाळात मोदीजी प्रत्येक राज्याचं जे काही काम उरलं आहे, ते पूर्ण करतील. आमचा मोदींना जाहीरपणे पाठिंबा आहे. आम्ही सर्व दिवस मोदींसोबत राहू. मोदी जे सांगतील तसेच होईल, असे उद्गार नितीश कुमार यांनी काढले. 


आम्हाला वाटतं की, तुम्ही पुढच्यावेळी पुन्हा सत्तेत याल, त्यावेळी यंदा जे काही थोडेफार जिंकलेत, ते सगळे हरतील. तुम्ही देशाची एवढी सेवा केली, तरीही असे झाले. पण आता तुम्हाला जी संधी मिळाली आहे, त्यामुळे भविष्यात विरोधकांना जिंकण्याची कोणतीही संधी उरणार नाही, असे नितीश कुमार यांनी म्हटले. नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर बिहारची जी काही कामं आहेत, ती सगळी होतील. आम्ही तु्म्ही जे सांगाल ते करु. आपण सगळे चांगले लोक एकत्र आलो आहोत, आपण आता एकत्र मिळून वाटचाल करु, असे नितीश कुमार यांनी म्हटले. 


माझा आग्रह तुम्ही लवकर शपथ घ्या: नितीश कुमार


यावेळी नितीश कुमार यांना नरेंद्र मोदी लवकरात लवकर देशाचे पंतप्रधान व्हावेत, यासाठी घाई झाल्याचे दिसले. त्यांनी म्हटले की, माझा आग्रह आहे की, तुम्ही लवकर शपथ घ्या. तुम्ही आता रविवारी शपथ घेणार आहात. माझ्या मते तुम्ही आजच पंतप्रधानपदाची शपथ घेऊन कामाला सुरुवात केली पाहिजे होती. तुमच्या कामामुळे देशाला फायदा होईल. आपण सगळे एकत्र राहू, मोदींचं ऐकून आपण पुढे चालत राहू, असेही नितीश कुमार यांनी म्हटले. 


आणखी वाचा


संविधानावर डोकं टेकून वंदन, नेतेपदी निवड, नरेंद्र मोदी 9 जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेणार!