Rahul Gandhi on NDA Government :  लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, पण त्यांचा पक्ष भाजप बहुमताच्या जादुई आकड्यापासून दूर राहिला आहे. 240 जागांवर घसरलेल्या भाजपला केंद्रात सत्तेवर येण्यासाठी 53 जागा असलेल्या मित्रपक्षांची मदत घ्यावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणतात की एनडीएचे अनेक मित्र पक्ष त्यांच्या म्हणजेच काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आहेत. 


राहुल यांचा दावा, मोदी सरकार खूप कमकुवत


सत्ताधारी एनडीए संख्याबळाच्या बाबतीत खूपच कमकुवत असून, थोड्याशा गडबडीने सरकार कोसळू शकते, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. फायनान्शिअल टाईम्स वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राहुल यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, 'संख्या इतकी कमी आहे की सरकार खूप नाजूक आहे आणि अगदी लहान गडबड देखील ते खाली आणू शकते. मुळात एका (एनडीए) मित्रपक्षाला दुसरीकडे वळावे लागेल. एनडीएचे काही सहयोगी 'आमच्या संपर्कात आहेत', असा दावाही त्यांनी केला. पण कोण? राहुल यांनी कोणाचेही नाव उघड केले नाही, मात्र मोदी गोटात 'असहमती' असल्याचे सांगितले.


निवडणुकीत मोदींची प्रतिमा नष्ट झाली 


लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून 'भारतीय राजकारणात मोठा बदल झाला आहे', असे ते म्हणाले. 'मोदींच्या विचारांना आणि प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे', असा दावा त्यांनी केला. निकालावर भाष्य करताना गांधी म्हणाले, 'द्वेष आणि रागाच्या राजकारणातून फायदा होऊ शकतो, ही कल्पना भारतातील जनतेने या निवडणुकीत नाकारली आहे. ज्या पक्षाने गेली 10 वर्षे अयोध्येबद्दल बोलण्यात व्यतीत केले तोच पक्ष अयोध्येतून साफ गेला आहे. धार्मिक द्वेष निर्माण करणारी भाजपची मूळ रचनाच कोलमडली आहे.


विरोधकांच्या चांगल्या कामगिरीचे श्रेयही राहुल यांनी भारत जोडो यात्रेला दिले


यावेळी विरोधकांची कामगिरी सुधारण्याचे श्रेयही राहुल गांधींनी आपल्या दोन भारत जोडो यात्रांना सुद्धा दिले. ते म्हणाले, 'न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे, संवैधानिक संस्था या सर्व (विरोधकांसाठी) बंद होत्या. मग आम्ही ठरवलं की स्वबळावर लढायचं. या निवडणुकीत यशस्वी झालेल्या अनेक कल्पना आपल्या विरोधात उभ्या केलेल्या भिंतीतून आल्या.


इतर महत्वाच्या बातम्या