मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कर्नाटक विधानसभा निवडणूक (Karnatak Assembly Election) घड्याळ चिन्हावर लढणार आहेत. पक्षाकडून विनंती केल्यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर कर्नाटक निवडणुक कोणत्या चिन्हावर निवडणुका लढणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होतं. अखेर निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. हा निर्णय फक्त या निवडणुकीपुरता मर्यादित आहे.
निवडणूक आयोगाच्या परवानगीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (NCP) कर्नाटक निवडणुकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आर हरी म्हणाले, आम्ही कर्नाटक मध्ये 46 जागांवर निवडणुका लढणार अहोत. आमचं चिन्ह फ्रिज झालं होतं. राष्ट्रवादी कर्नाटक स्वबळावर लढणार आहे. आमच्याकडे सध्याचा भाजपचा आमदार दोन दिवसांपूर्वी आला आहे. त्यामुळे ताकद वाढणार आह. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता आम्हाला घडयाळ चिन्हावर निवडणूक लढता येणारं आहे. कर्नाटक निवडणुकीसाठी कर्नाटकमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पाच ते सहा सभा घेण्यात येणर आहे.
राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगानं काढून घेतला आहे. 23 वर्षानंतर राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा दर्जा आता महाराष्ट्र आणि नागालँड या दोन राज्यपुरता असणार आहे. 2014, 2019 च्या दोन लोकसभा निवडणुका आणि 2019 नंतर 21 पैकी 12 राज्यात जिथे राष्ट्रवादी लढली तिथल्या कामगिरीच्या आधारे निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे. तृणमूल काँग्रेस, माकप या दोन पक्षांसह राष्ट्रवादी हा तिसरा पक्ष ठरलाय, ज्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काल आयोगानं काढून घेतला आहे.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला म्हणजे काय काय गेलं?
- राष्ट्रवादीला त्यांचं घड्याळ हे चिन्ह आता केवळ महाराष्ट्र, नागालँड या दोन राज्यांत कायम ठेवता येईल
- इतर राज्यांत कुणी हे चिन्ह मागितलं तर निवडणूक आयोग ते तात्पुरतं देऊ शकतं
- राष्ट्रीय पक्षाला राजधानी दिल्लीत पक्ष कार्यालयासाठी जागा मिळते ती राष्ट्रवादीला आता मिळणार नाही
- निवडणुकीत सरकारी वाहिन्यांवर प्रचारासाठी राखीव असलेला वेळ आता राष्ट्रवादीला मिळणार नाही
कर्नाटकात 10 मे रोजी मतदान
कर्नाटकात एकाच टप्प्यात मतदान आहे. 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या.