Maoists Attack In Bihar : बिहारमधील गयामध्ये नक्षलवाद्यांनी भ्याड हल्ला केलाय. नक्षलवाद्यांनी एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गयापासून 70 किमी दूर असलेल्या मौनवार गावात नक्षल्यांनी एकाच घरातील चार जणांना फासावर लटकवलं. त्या कुटुंबाचं घरही बॉम्बने उडवलं. मृतामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. 

Continues below advertisement


गया पासून अवघ्या 70 किलोमीटर दूर असलेल्या मौनवार गावात नक्षलवाद्यांनी दोन महिलांसह चार जणांची हत्या केली आहे. या चार जणांना घराबाहेर फासावर लटकवलं. एकाच कुटुंबातील दोन पती-पत्नीचा समावेश आहे.  गावातील लोकांमध्ये भिती आणि दहशत निर्माण व्हावी, यासाठी नक्षल्यांनी चार जणांना मारल्यानंतर त्यांचा मृतदेह घराबाहेर लटकावलं. हत्या केलेल्या कुटुंबाच्या घरालाही बॉम्बनं उडवलं. दुचाकीलाही आग लावली.  नक्षलवाद्यांनी हत्या केलेल्या चार जणांमध्ये सतेंद्र सिंह, महेंद्र सिंह, मनोरमा देवी आणि सुनीता सिंह यांचा समावेश आहे. हत्या केल्यानंतर नक्षलवाद्यांनी तिथे एक चिठ्ठीही सोडली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलेय की, देशद्रोही, खुनी आणि विश्वासघात करणाऱ्यांना मारण्याशिवाय पर्याय नव्हता. अमरेश, सीता, शिवपूजन आणि उदय या आमच्या चार साथीदारांच्या मृत्यूचा हा बदला आहे. या विष देऊन मारलं होतं. यापुढे अशा घटना होऊ नयेत, म्हणून चार जणांना मारलं.  घटनास्थळावर असलेली ही चिठ्ठी मुक्ती छापाकार सेना, मध्य जोन झारखंड, भाकपा (माओवादी) यांच्या नावाने आहे. 
 
या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण परिसरात भितीचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास घेत आहेत. पण, याबाबत परिसरातील एकही व्यक्ती बोलायला तयार नाही. गया येथील मुख्य वरीष्ट अधिकारी घटनास्थळावर पोहचले आहेत. याप्रकरणार एसएसपी आदित्य कुमार म्हणाले की, ‘नक्षलवाद्यांचा हा भ्याड हल्ला निवडणुकीत लोकांमध्ये भिती निर्माण करण्यासाठी होता. ज्या ठिकाणी चार नक्षलवाद्यांना मारलं होतं, त्याच ठिकाणी ही घटना घडली आहे. पोलिसांकडून या घटनेबाबत चौकशी केली जात आहे. पोलिसांकडून परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे.’