Coronavirus Today : कोरोना महामारीचा (Coronavirus) देशातील प्रादुर्भाव अद्याप कमी व्हायचं नाव घेईना. काही राज्यातील रुग्णसंख्या सातत्यानं वाढत असल्यामुळे देशाच्या दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 11 हजार 271 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 285 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. याच कालावधीत 11,376 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या एक लाख 35 हजार 918 इतकी झाली आहे.


4,63,530 जणांचा मृत्यू –
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीन कोटी 44 लाख 37 हजार 307 इतकी झाली आहे. तर उपचाराधीन रुग्णांची संख्यामध्ये घट झाली आहे. देशातील एकूण उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाख 35 हजार 918 इतकी झाली आहे. कोरोना महामारीमध्ये देशात आतापर्यंत चार लाख 63 हजार 530 जणांचा मृत्यू झालाय. 

3,38,37,859 जणांची कोरोनावर मात –
सलग 37 दिवसांपासून देशातील दैनंदिन रुग्णसंख्या ही 20 हजारांखाली तर सलग 140 दिवसांपासून 50 हजारांखाली नोंदवली गेल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या 0.40 टक्के इतकी आहे. मार्च 2020 नंतर ही सर्वात कमी संख्या आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत तीन कोटी 38 लाख 37 हजार 859 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोनाचा मृत्यूदर 1.30 टक्के इतका झालाय.






केरळनं देशाची चिंता वाढवली –
केरळमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होण्याचं नावं घेत नाही. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या एकूण कोरोना रुग्णांच्या 50 टक्के रुग्ण एकट्या केरळ राज्यातील आहेत. मागील 24 तासांत केरळमध्ये 6,468 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 23 जणांचा मृत्यू झालाय. केरळमधील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 50,55,224 इतकी झाली आहे. केरळमधील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं देशाची चिंता वाढवली आहे.  


112 कोटी डोस –
कोरोनाविरोधात देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत 111 कोटींपेक्षा जास्त लसीचे डोस देण्यात आले आहेत. मागील 24 तासांत देशात 57 लाख 43 हजार 840 जणांना कोरोनाप्रतिबंधक लस देण्यात आली आहे. देशात आतापर्यंत 112 कोटी 1 लाख 3 हजार 225 लसीचे डोस देण्यात आले आहेत.