Nawab Malik Allegations : सामाजिक न्याय केंद्रीय राज्य मंत्री बनावट कागदपत्राच्या आधारावर नोकरी मिळवलेल्या व्यक्तीचं समर्थन करत आहेत. हे दुर्भाग्यपूर्ण आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अपाध्यक्ष अरुण हलदरजी भाजपचे नेते असतील. पण राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या जबाबदाऱ्या त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. कार्यपद्धती समजून घ्यावी. ज्या पदावर बसले आहेत, त्याचं आचरण कसं असायला हवं? या सर्व मर्यादा ओलांडत आहेत. समीर वानखेडे यांच्या घरी जाऊन ते क्लिनचीट कशी देऊ शकतात? संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती समीर वानखेडे यांना क्लिनचिट कशी देऊ शकते? याबाबत आम्ही राष्ट्रपती आणि सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहोत. या प्रकरणाचा तपास व्हावा अशी मागणी करणार आहोत. बनावट कागदपत्राच्या आधारावर नोकरी मिळवल्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीबद्दल ममत्व का दाखवतं होते? त्यांनी मला अशीही धमकी दिलेय की, जास्त बोलाल तर अट्रासिटी कायद्याअंतर्गत कारवाई करुन तुरुंगात टाकू. जो व्यक्ती मागासवर्गीय नाही, त्याच्या आधारावर तुम्ही मला धमकावायचं काम करत आहात? आमचाही राजकीय अनुभव आहे. सर्वांनी मर्यादेत राहायला हवं, असे नवाब मलिक म्हणाले. 


राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अपाध्यक्ष अरुण हलदर यांचं वर्तन संशयास्पद आहे. बनावट कागदपत्राच्या आधारावर नोकरी मिळवल्याचा आरोप असणाऱ्या समीर वानखेडे यांच्या घरी ते कसे जाऊ शकतात. त्यांच्या घरी जाऊन कागदपत्रे पाहतात आणि क्लिनचीट देतात. संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती समीर वानखेडे यांना क्लीनचिट कशी देऊ शकते? असा प्रश्न नवाब मलिक यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांना विचारला. 
 
एनसीबी आधिकारी समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांच्याकडे केलेल्या तक्रारीचं नवाब मलिक यांनी यावेळी खंडन केलं. तीन वर्षांच्या मुलांचे फोटोही नवाब मलिकांनी उघड केल्याचा आरोप वानखेडे यांनी केला होता. तसेच वारंवार पत्रकार परिषद घेत आरोप करत असल्याचा कुटुंबाला त्रास होत असल्याचेही समीर वानखेडे म्हणाले होते. नवाब मलिक यांनी या सर्व आरोपाचं खंडन केलं आहे. मलिक म्हणाले की, 'समीर वानखेडे यांच्या दुसऱ्या बायकोचं मी नावही घेतलेलं नाही. ना त्यांच्या मुलांची नावं किंवा फोटो जाहीर केले आहेत. जर खोटं बोलायचं आहे तर नीट तरी बोला म्हणजे किमान लोकांना वाटेल की तुम्ही खोटं बोलत नाही.'


देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन राज्यात ड्रग्जचा खेळ सुरु - 


नवाब मलिकांनी आज माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागली असून अनेक गंभीर आरोप केले. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन राज्यात ड्रग्जचा खेळ सुरु आहे, असा गंभीर आरोप नवाब मलिकांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना अमृता फडणवीसांनी नदी संरक्षणासाठी गाणं गायलं होते. यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनय केला होता. डायरेक्टर सचिन गुप्ता होते. ते गाणं अभिजीत जोशी यांनी लिहिलेले होते. त्याचे फायनान्स हेड ड्रग्स पेडलर जयदीप राणा होता. जयदीप राणा यांच्यासोबत फडणवीसांचा काय संबंध आहे? याची चौकशी व्हायला पाहिजे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात ड्रग्सचे धंदे चालतात. जयदीप राणा हे फडणवीसांच्या घरच्या कार्यक्रमात उपस्थित राहतात. ड्रग्स रॅकेटला फडणवीस संरक्षण देतात, असा गंभीर आरोप मलिक यांनी केलाय.