नवी दिल्ली : काँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधींची भेट घेतली. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यासोबत वाढलेल्या तणावानंतर पहिल्यांदाच सिद्धू आज पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले. सिद्धूंनी राहुल आणि प्रियांका गांधींना सद्यस्थितीबाबत माहिती दिली.


पंजाबमध्ये मंत्रिमंडळातील जागेवरुन सिद्धू  आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यात तणाव आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर सिद्धू दिल्लीत दाखल झाले आहेत. सिद्धू पंजाबमधील मंत्रिपदही सोडण्याची चिन्हं आहेत.काँग्रेस पक्षश्रेष्ठींना भेटल्यानंतर सिद्धूंनी एक ट्वीटही केलं आहे. काँग्रेस अध्यक्षांना भेटून त्यांना पंजाबमधील परिस्थितीची जाणीव करुन दिल्याचं नवज्योतसिंह सिद्धूंनी म्हटलं आहे.


पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या कॅबिनेटमध्ये सिद्धूंच्या मंत्रिपदात फेरबदल करत त्यांच्याकडून महत्त्वाची खाती काढून घेण्यात आली होती. यानंतर सिद्धूंना ऊर्जामंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. या मंत्रालयाचा पदभार अजूनही सिद्धूंनी स्वीकारलेला नाही. यामुळेच दोघांमधील तणाव माध्यमांसमोर आला.