अमृतसर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारताच्या सीआरपीफ जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरातून संतापाची लाट उसळली. देशभरातून पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची मागणी होऊ लागली. परंतु माजी क्रिकेटर आणि पंजाबचे सांस्कृतिक मंत्री नवज्योतसिंह सिद्धूने मात्र मवाळ भूमिका घेतली.


सिद्धूने भारतीयांच्या संतापावर नाराजी व्यक्त करत दोन्ही देशांमधील वाद चर्चेतून सोडवण्याचा सल्ला दिला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही मुजोरी दाखवत सिद्धू शहीद जवानाच्या अंत्यसंस्काराला गैरहजर राहिला. त्यामुळे देशभरातून सिद्धूविरोधात नाराजीचा सूर आहे. कालपासून सिद्धूची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी देशभरातून होत आहे. पंजाबमधील अनेक मंत्र्यांनीदेखील अशीच मागणी केली आहे. आहे. त्यामुळे सिद्धूची मंत्रिंडळातून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पंजाबचे मंत्री विपुल गोयल यांनी सिद्धू यांना ताबडतोब बाहेरचा रस्ता दाखवावा अशी मागणी केली आहे. सिद्धूने ज्या पद्धतीने वक्तव्य केलं आहे, त्यानूसार त्याला कोणतंही संविधानिक पद भूषवण्याचा अधिकार नाही.

केंद्र सरकार एकीकडे संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे सिद्धू आपल्या देशाऐवजी दहशतवादी राष्ट्राचं समर्थन करत आहे. त्यामुळे सिद्धूला पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी काँग्रेसच्याच मंत्र्याने केली आहे. दरम्यान, टीव्हीवरील 'दी कपिल शर्मा शो' या कार्यक्रमामधूनही सिद्धूची हकालपट्टी करण्याचा निर्णय सोनी टीव्हीने घेतला आहे.

वाचा : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही शहीद जवानांच्या अंत्यसंस्काराला नवज्योतसिंह सिद्धू गैरहजर

दरम्यान, सिद्धूच्या अशा वागण्यामुळे पंजाबच्या कॅबिनेटमधील मंत्री त्यांच्यावर नाराज आहेत. सिद्धूची पंजाबच्या कॅबिनेटमधून हकालपट्टी करा अशी मागणी आता होऊ लागली आहे. या घटनेमुळे #SackSidhuFromPunjabCabinet असा एक हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे.